• Home
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🌹🌿*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🌹🌿*

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201206-WA0145.jpg

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🌹🌿*

महाराजा सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
निलोफर मुजावर, वारणानगर
(८९५६५८१६०९)

महात्मा फुले, दादाभाई नौरोजी, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक, गोपाल कृष्ण गोखले, श्यामजी कृष्ण वर्मा, महात्मा गांधी, राजर्षी शाहू, कृष्णराव केळुसकर यांच्यासह असंख्य भारतीय क्रांतिकारक आणि समाजसुधारकांना सक्रीय मदत करणाऱ्या महाराजा सयाजीरावांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील अनन्यसाधारण स्थान आजवर दुर्लक्षित राहिले आहे. आज ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सयाजीराव आणि बाबासाहेब यांच्यातील नाते समजून घेणे आपल्या अचूक इतिहास ‘साक्षरते’साठी उपयुक्त ठरेल.

आधुनिक काळात कोणत्याही भारतीय भाषेतील पहिल्या बुद्ध चरित्राचे लेखक कृष्णराव अर्जुन केळुसकर हे महाराजा सयाजीराव आणि बाबासाहेब यांच्या नात्यातील महत्वपूर्ण दुवा आहेत. १९०७ मध्ये एलफिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भीमरावांच्या अभिनंदनासाठी चाळीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी भीमरावाला कॉलेजमध्ये पाठविण्याचा सल्ला भीमरावांच्या वडिलांना दिला. आंबेडकरांची आर्थिक अडचण समजताच केळुसकर म्हणाले, “इंदू प्रकाशनचे मालक दा. सा. यंदे हे माझे स्नेही आहेत. त्यांच्या मदतीने श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना भेटू.”
महाराजांसोबतच्या भेटीत महाराजांनी भीमरावांना विचारले, “किती शिकलास? पुढे कुठेपर्यंत शिकायचं? शिकून पुढे काय करणार आहेस?”

भीमराव म्हणाले, “महाराजांची आज्ञा होईल त्याप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.”

“शिक्षण संपादन केल्यानंतर तुम्ही आपल्या जातीच्या व विद्येत मागे पडलेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याची कामगिरी हाती घेतली पाहिजे. आम्ही बडोद्यात हे कार्य सुरू केले आहे. त्या कार्याप्रित्यर्थ तुम्ही आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे.” महाराज म्हणाले.

महाराजांच्या आज्ञेनुसार पुढील शिक्षणास तयार झालेल्या भीमरावांना पदवी शिक्षणासाठी १९०८ ते १९१३ अशा ५ वर्षांसाठी दरमहा २५ रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. पदवी शिक्षणानंतर शिष्यवृत्तीच्या करारानुसार डॉ. आंबेडकर १९१३ मध्ये बडोद्यात नोकरीसाठी गेले. महिना ७५ रुपयावर लष्करी विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून बाबासाहेबांची नेमणूक झाली. परंतु आठवड्याभरातच वडील आजारी असल्याची तार आल्याने बाबासाहेब मुंबईला परत आले. काही दिवसांनी बाबासाहेबांनी महाराजांची मुंबईत भेट घेवून सर्व हकीकत सांगितली. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि सुंदर हस्ताक्षर पाहून महाराज म्हणाले, “तुला पुढे कोणत्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो? अमेरिकेतील उच्चशिक्षणासाठी तुला पाठवण्याचा माझा विचार आहे.” भीमरावांनी महाराजांच्या सांगण्यावरून बडोद्यास अर्ज पाठवला.

विद्यार्थी परदेशात शिकायला जात तेव्हा बडोदा सरकार अटींचे बंधपत्र लिहून घेत. याशिवाय बडोदावासीय माणसांचे हमीपत्र द्यावे लागे आणि शिष्यवृत्तीची सर्व रक्कम फिटेपर्यंत संस्थानात नोकरी करावी लागे. हमीपत्रासाठी भीमरावांना बडोदावासीय इसम न मिळाल्याने महाराजांनी त्यांना सूट दिली. करारपत्रावर दोन साक्षीदार त्रिभुवन व्यास व अंताजी जोशी यांनी सह्या केल्या आणि १९१६ पर्यंत शिष्यवृत्ती मंजूर झाली. १९१५ ला कोलंबिया विद्यापीठातून भीमराव एम.ए. पास झाले. त्यानंतर अर्थशास्त्रातून ‘The National Dividend of India: A Historical and Analytical Study’ प्रबंध पूर्ण करून पीएच.डी पदवी प्राप्त केली. १९२४ मध्ये हा प्रबंध विस्तृत स्वरूपात लंडन मधून प्रकाशित झाला. हा ग्रंथ बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. आता एकच वर्षांची शिष्यवृत्ती शिल्लक होती. लंडन येथे जाऊन अर्थशास्त्रात पीएच.डी. आणि बॅरिस्टर व्हावे असे भीमरावांना वाटू लागले. त्यासाठी महाराजांकडे आणखी दोन वर्षे शिष्यवृत्ती वाढविण्यासंदर्भात अर्ज केला असता दिवाणांनी प्रशासकीय कारण पुढे करून शिष्यवृत्ती नाकारली पण महाराजांनी आणखी एक वर्ष शिष्यवृत्ती चालू ठेवण्याचा हुकूम दिला. बडोदा सरकारच्या नियमाप्रमाणे एका विद्यार्थ्याला एकदाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल हा नियम मोडून महाराजांनी तीन वेळा आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली. भीमरावांनी एम.एस.सी आणि बॅरिस्टर दोन्ही विषयांचा अभ्यास केला परंतु वेळेअभावी त्यांना भारतात परतावे लागले. अशाप्रकारे १९०८ ते १९१७ अशी ९ वर्षे सयाजीरावांनी बाबासाहेबांना पदवी आणि अमेरिका-इंग्लंडमधील उच्चशिक्षणासाठी सुमारे २०, ००० रु. शिष्यवृत्ती दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम अंदाजे ९० लाख रु. इतकी भरते.

इंग्लंडमधील उच्च शिक्षणानंतर बाबासाहेब कैसर-ए-हिंद बोटीने आधी परतले. त्यांचा मौलिक ग्रंथसंग्रह थॉमस कुक अँड कंपनीतर्फे वेगळ्या बोटीने मागून येत असताना भूमध्य समुद्रात या बोटीचा अपघात झाला. यावेळी महाराजांनी नुकसान भरपाई म्हणून पाचशे रुपये मदत बाबासाहेबांनी न मागता दिली आणि विमा कंपनीकडून चारशे रुपये मिळाले. महाराजांनी दिलेली मदत ही विमा कंपनीपेक्षाही अधिक होती. यावरून महाराजांचे बाबासाहेबांविषयीचे आपुलकी व्यक्त होते.

सयाजीरावांनी उच्चशिक्षण घेवून परतलेल्या भीमरावांची बडोद्याच्या धारासभेवर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. ही नेमणूक करत असतानाच ज्या सदस्यांची अस्पृश्य सदस्यांसोबत कायदेमंडळात बसण्याची तयारी आहे त्यांनाच धारा सभेची निवडणूक लढवण्याची परवानगी देणारा नियम केला. खास भीमरावांसाठी सयाजीरावांनी हा नियम केला होता. १९१७ मध्ये अर्थ खात्यात मंत्री म्हणून भीमरावांची नेमणूक करण्याची महाराजांची इच्छा होती.

बडोद्यात नोकरीसाठी आलेल्या भीमरावांची सयाजीरावांनी सुरुवातील सरकारी अतिथी गृहात वास्तव्याची व्यवस्था केली. त्यानंतर भीमरावांसाठी स्वतंत्र बंगला बांधण्याचा निर्णय घेऊन महाराजांनी या बंगल्यासाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याचे आदेश दिवाणांना दिले. महाराजांनी बाबासाहेबांची बडोद्यात घेतलेल्या काळजीचा हा आजवर दुर्लक्षित राहिलेला महत्वपूर्ण पुरावा आहे. परंतु सहकाऱ्यांचा असहकार आणि दुर्वर्तनामुळे भीमराव बडोद्याची नोकरी सोडून मुंबईला परतले. बडोदा संस्थानच्या नियमानुसार शिष्यवृत्ती प्राप्त व्यक्तीने संस्थानात नोकरी करणे अनिवार्य होते. परंतु महाराजांनी यामध्येसुद्धा आंबेडकरांना सुट दिली.

१९३१ मध्ये दुसर्‍या गोलमेज परिषदेतील अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांचे विद्वत्तापूर्ण भाषण ऐकल्यानंतर खुश होऊन महाराजांनी लंडनच्या हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये बाबासाहेबांना पार्टी दिली. या पार्टीत सयाजीरावांनी इतर मान्यवरांसमोर बाबासाहेबांचे पूर्वायुष्य व विद्वत्ता विशद करणारे भाषण केले. यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या आवाहनानुसार उपस्थित मान्यवरांनी अस्पृश्योद्धाराच्या कामाला महाराजांच्या १५० पौंडासह एकूण १३३५ पौंडची मदत केली. आजच्या रूपयाच्या मूल्यात ही रक्कम ४ कोटी ४४ लाख रु. इतकी भरते.

बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णायक टप्प्यावर महाराजांनी वेळोवेळी त्यांना आर्थिक सहाय्य केले. महाराजांनी बाबासाहेबांना आयुष्यभर केलेली आर्थिक मदत आजच्या रुपयाच्या मूल्यात ४ कोटी ९४ लाख रुपयांहून अधिक भरते. १९३६ मध्ये पुण्यातील अहिल्याश्रम भेटीवेळी केलेल्या भाषणात बाबासाहेबांना केलेल्या या मदतीविषयी बोलताना महाराज म्हणतात, “ डॉ. आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली. त्यांना अमेरिकेत उच्च शिक्षण माझ्या खर्चाने दिले ही गोष्ट खरी आहे. शिक्षण घेऊन परत आल्यावर त्यांना मी बडोद्यात नोकरी दिली परंतु त्यांना राहावयास घरासंबंधी अडचण आल्यामुळे ते मुंबईला गेले. ते गेले त्यामुळे आमचा रोष न होता आम्हास एक प्रकारे आनंद झाला. कारण त्यांना शिकवण्याचा आमचा मुख्य हेतू त्यांनी शहाणे होऊन आपल्या समाजाच्या उद्धाराचे कार्य करावे हाच होता. ते काम त्यांनी हाती घेतलेले पाहून आमचा हेतू सफल झाला असे आम्हास वाटते.”

गौतम बुद्ध हा बाबासाहेब आणि सयाजीराव यांना जोडणारा दुवा आजवर अदृश्य राहिला आहे. सयाजीरावांच्या धर्मविषयक भाषणांत गौतम बुद्धांचे संदर्भ सातत्याने सापडतात. आधुनिक काळात बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे सयाजीराव एकमेव प्रशासक होते. बुद्धांचा आदर्श जनतेसमोर ठेवण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी १९१० मध्ये बडोद्यातील ज्युबिली बागेत बुद्धाचा पुतळा जपानहून आणून बसवला होता. या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर बुद्धांची वचने कोरली आहेत. बाबासाहेबांना बुद्धाचा पहिला परिचय करून देणारे केळूसकरलिखित बुद्धचरित्र १८९८ मध्ये सयाजीरावांनी प्रकाशित केले होते. या पुस्तकाचे बाबासाहेबांच्या वैचारिक जीवनातील आणि धर्मांतराच्या निर्णयातील स्थान निर्णायक होते.

स्वतःच्या आयुष्याबरोबरच भारताच्या उभारणीतील सयाजीरावांचे स्थान अधोरेखित करताना १९३९ मध्ये ‘जनता’ वृत्तपत्रातील महाराजांवरील मृत्युलेखात बाबासाहेब लिहितात, “महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही.” या मृत्यूलेखात बाबासाहेबांनी बडोद्यातील सुधारणा कायद्यांची तुलना युरोप-अमेरिकेतील प्रगत कायद्यांशी करून बडोद्यातील कायदे हे या प्रगत राष्ट्रातील कायद्यांपेक्षाही पुढारलेले असल्याचा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. पुरोहित कायदा, हिंदू स्त्रियांचा संपत्तीतील हक्क कायदा अशा अनेक जगातील एकमेव आणि सर्वप्रथम कायद्यांची ओळख आंबेडकरांना बडोद्यातच झाली. या संदर्भात प्र.के. अत्रे म्हणतात, “१९०५ साली महाराजांनी हिंदू कायदा कोडाच्या स्वरूपात प्रसिद्ध करून जे ब्रिटिशांना हिंदुस्थानात शक्य झाले नाही एवढेच नव्हे तर आता काँग्रेसच्या राज्यात कायदेमंत्री डॉ.आंबेडकर यांनाही करता आले नाही ते त्यांनी करून दाखवले.” घटना समितीचे सदस्य म्हणून काम करताना बाबासाहेबांसमोर या पुरोगामी कायद्यांचा नमुना उपलब्ध होता. जगभरातील प्रगत राज्यघटनांबरोबरच सयाजीरावांच्या कायद्यांनी राज्यघटनेला नवीन ऊर्जा पुरवली.

बाबासाहेबांच्या जडणघडणीतील बडोदा अध्यायाचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे. एक महान भूमिपुत्र म्हणून बाबासाहेबांचा विचार करताना महाराजा सयाजीराव गायकवाडांना वगळून पुढे जाता येणार नाही. महाराजांच्या निधनानंतर महाराजांचे नातू आणि बडोद्याचे उत्तराधिकारी प्रतापसिंह महाराजांना बाबासाहेबांनी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी महाराजांचे चरित्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केली ही बाब सयाजीरावांचे आंबेडकरांच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे. १९२७ नंतर आंबेडकरांना ‘डॉ. बाबासाहेब’ ही ओळख मिळाली. क्रांतिकारक लोकनायक म्हणून ही ओळख निर्माण झाली. यामध्ये बाबासाहेबांना अमेरिकेला पाठवण्याचा सयाजीरावांचा निर्णय सर्वाधिक कारणीभूत होता. म्हणून ‘भीमराव ते डॉ. बाबासाहेब’ या क्रांतीपर्वाचे सूत्रधार म्हणून महानिर्वाणदिनी बाबासाहेबांबरोबर सयाजीरावांना सलाम करणे कृतज्ञतेचे ठरेल.

anews Banner

Leave A Comment