“मुंबई मध्ये हाय अलर्ट जारी – ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
मुंबई, दि. २७ – देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी दहशत वाद्यांकडून हल्ला करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ड्रोन, रिमोट कंट्रोलवर चालणार्या छोट्या विमानांनी हा हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्याच बरोबर पॅराग्लायडरच्या मदतीनेही हल्ला केला जाण्याची शक्यता आहे.मुंबईतील मंदिरं, गर्दीची ठिकाणं ही दहशत वाद्यांच्या सॉफ्ट टार्गेटवर आहे. याआधीही मुंबईत घातपात घडवण्याचा इशारा देण्यात आला होता.खबरदारीचा उपाय म्हणून 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला असून महिन्याभरासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.तसंच, कुठेही संशयित व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.