Home गडचिरोली श्रद्धेच्या ठिकाणी दुर्गंधीचा विळखा! सेमाना देवस्थानात अस्वच्छतेचा कळस,ट्रस्ट व प्रशासन मौनात ?

श्रद्धेच्या ठिकाणी दुर्गंधीचा विळखा! सेमाना देवस्थानात अस्वच्छतेचा कळस,ट्रस्ट व प्रशासन मौनात ?

77

आशाताई बच्छाव

1002387233.jpg

श्रद्धेच्या ठिकाणी दुर्गंधीचा विळखा! सेमाना देवस्थानात अस्वच्छतेचा कळस,ट्रस्ट व प्रशासन मौनात ?

दिं.25/12/2025
जिल्हा प्रतिनिधी: सुरज गुंडमवार

गडचिरोली :गडचिरोली शहरातील हजारो भाविकांची श्रद्धास्थान असलेले सेमाना देवस्थान आज प्रचंड अस्वच्छतेमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात, तर अनेक जण येथे भोजनाचा कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, भोजनानंतर उरलेले अन्न व कचरा थेट देवस्थान परिसरातच टाकण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

हे देवस्थान केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक वारसाही आहे. असे असताना येथे स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. कचऱ्याचे ढीग, उघड्यावर टाकलेले अन्न, माशा व दुर्गंधी यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याकडे सेमाना देवस्थान ट्रस्ट जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप भाविकांकडून होत आहे.

दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, मात्र त्यांच्यासाठी मूलभूत स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था नसणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यासोबतच स्थानिक प्रशासन व नगरपालिका यांचेही याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येते.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले “स्वच्छ भारत – सुंदर भारत” हे स्वप्न अशा परिस्थितीत केवळ घोषणापुरतेच उरले आहे का? धार्मिक स्थळांवर स्वच्छता राखणे ही प्रशासनाची आणि ट्रस्टची संयुक्त जबाबदारी असताना, येथे मात्र श्रद्धेची खुलेआम विटंबना होत आहे.

भाविकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, लवकरात लवकर स्वच्छता मोहीम राबवावी, कचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी होत आहे.

👉 प्रशासन यावर केव्हा जागे होणार?
👉 सेमाना देवस्थान ट्रस्ट जबाबदारी स्वीकारणार का?
👉 की भाविकांच्या आरोग्याशी असा खेळ सुरूच राहणार?

जर तात्काळ दखल घेतली नाही, तर भाविक आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत.