आशाताई बच्छाव
साई जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने! माझी प्रेरणाशक्ती आशाताई बच्छाव!!
असंख्य स्नेही जनहो,जय जिजाऊ जय शिवराय! मी राजेंद्र पाटील राऊत एक सर्वसामान्य कुटुंबातील असधारण व्यक्ती म्हणून सततच उपेक्षिताचे जीवन जगत आलो.गरीबी काय असते, हे अगदी जवळून अनुभवले,तसा माझा जन्म आजच्या अहिल्यानगर व पुर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा.माझे वडील महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरीत असताना त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.तेव्हा मी अगदी म्हणजे दिड वर्षांचा होतो.माझ्या आईने तिच्या माहेरी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळील कौळाणे (निं) या गावी आजोळी आणले.तेथेच माझे संपूर्ण जीवन व्यतीत झाले.लोकांच्या शेतात मोलमजुरीची कामे करून शिक्षण पूर्ण केले.लहानपणी भोगलेले दुःख कधीही न विसरता येणा-या जखमा म्हणून कायमच मनावर कोरल्या गेल्यात.लहानपणी मला महत्वाचा व मोलाचा आधार ठरला तो म्हणजे माझ्या आईचा मामेभाऊ दादाजी रतन शेवाळे कौळाणे जवळील व-हाणे गावी राहायचे, मला लहानपणी सतत या नातेवाईक असलेल्या देवमाणसाने मदतच केली आहे.माझ्या आईच्या मामाचे गाव व-हाणे असल्यामुळे मी सतत दादाजी रतन शेवाळे यांचेकडे जास्तीत जास्त वास्तव्यास असायचो.
असो, जेमतेम शिक्षण पूर्ण करून पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी हिंडलो, लहानपणीच मोठमोठ्या शहरांत राहून पत्रकारितेचे शिक्षण घेतले व अगदी गाव पातळीपासून सुरू केलेली पत्रकारिता मी राज्यस्तरीय वृत्तपत्रात सेवा करून पुर्ण केली.पुढे स्वतः चे वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधनातून जनजागृती उभी केली.आर्थिक परिस्थिती नसतांनाही पदरमोड करून वृत्तपत्र जीवंत ठेवलीत.पुढे सन २००५ मध्ये माझ्या सोबत वृत्तपत्रीय चळवळीशी दादाजी रतन शेवाळे यांची मुलगी आशाताई बच्छाव शेवाळे जोडली गेली.आणि मग “युवा मराठा”नावाच्या छोट्याशा वृत्तपत्रात आमुलाग्र बदल घडवीत ही “युवा मराठा”नावाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जोमाने उभी करण्यात आशाताई बच्छाव यांचा मोलाचा वाटा आहे.हे सगळं करीत असताना मला आशाताई बच्छाव यांच्या प्रेरणेतून अनेक पुरस्कार मिळाले.अगदी राज्यस्तरीय पुरस्कार सुध्दा मिळालेत.मग मागे वळून न पाहता आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या संस्थेची स्थापना करून सामाजिक कार्याला वाहून घेतले.त्यातूनच युवा मराठा महासंघ या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली.व संघटनेच्या माध्यमातून अल्पावधीत अनेक संघर्षात्मक आंदोलने करून अनेक जनसामान्यांना न्याय मिळवून दिला.हे सगळं करत असताना ९ आँगस्ट २०२५ रोजी क्रांतीदिनी लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रात कार्याला सुरुवात करण्यात आली.हाच तो काय आशाताई बच्छाव यांच्या प्रेरणेतून साकार झालेला “युवा मराठा”चळवळीचा व्यशस्वी प्रवास!
माझी प्रेरणाशक्ती आशाताई बच्छाव
खरं तर सन २००५ अगोदर मी एक साधारण पत्रकार म्हणून जीवन जगत असताना, त्याला पुढे नावारूपास आणून एक नावलौकिक प्राप्त पत्रकार म्हणुन घडविण्याचे महत कार्य आशाताई बच्छाव यांच्या प्रेरणेतून घडले.त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक रुपात रामभाऊ आवारे सर निफाड, विजय पवार मुंबई,व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या “युवा मराठा”चळवळीशी जवळून कौटुंबिक जिव्हाळ्याची संबंध जोपासणारी पत्रकार, प्रतिनिधी, ब्युरो चीफ बांधव यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.माझ्या सारख्या एका सामान्य माणसाला जाहिर झालेला “साई जीवनगौरव पुरस्कार २०२६” हा खरे अर्थाने आशाताई बच्छाव यांच्या दुरदृष्टीने लाभलेल्या प्रेरणेतून लाभला अस म्हणणेच अधिक योग्य ठरेल.राष्ट्रिय पातळीवरील असलेला हा पुरस्कार मला १० जानेवारी २०२६ रोजी साईबाबांच्या पुण्यभूमीत प्रदान केला जाणार असून, माझ्या स्वतःच्या जन्मभूमी असलेल्या मायभूमीतील जिल्ह्यात पहिल्यांदाच मला हा पुरस्कार प्राप्त होत असल्याने मी साईचरणी नतमस्तक झालो आहे.तर या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक सुदाम संसारे सर यांचेही आभार मानतो. या साई जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे
सव्वा फुटाची भव्य व दिव्य ट्रॉफी त्यावर पुरस्कारार्थींचे नाव व फोटो असेल. एक फोटो फ्रेम केलेले सन्मानपत्र. त्यावर पुरस्कार कर्त्याचे नाव व फोटो आणि केलेल्या कार्याचा उल्लेख असेल. एक गोल्ड मेडल. साईबाबांच्या च्या नावाची ओम साई लिहीलेली शाल. एक रुबाबदार कोल्हापूरी फेटा.एक गुलाबपुष्प.एक बॅग(थैली).त्यावर साई ची प्रतिमा असेल
तसेच आलेल्या एकुण महिला मधुन त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढुन १२ भाग्यवान महिलांची निवड करुन त्यांना १२ नग पैठणी साड्या सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच आलेल्या एकुण पुरुषा मधुन १२ भाग्यवान पुरुषांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढुन त्यांना१२ नग ड्रेस कपडा (पॅन्ट पीस व शर्ट पीस )सप्रेम भेट देण्यात येणार आहे.व शेवटी गोड आशा पंचपक्वान्नाचे भोजन दिले जाणार आहे. राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा






