आशाताई बच्छाव
….. प्रेरणादायी लेख…..
योगायोग नव्हे, प्रेरणेचा संदेश
२ ऑक्टोबरचे बहुविध पर्व
धम्म, विजय, सत्य अहिंसा घेऊ ध्यास.
करुणा, समता,प्रामाणिकतेचा करू विश्वास,
शास्त्री – गांधीचा मार्ग धरू आपण सारे,
भारत उजळेल नवा, स्वप्न होईल खरे….
भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहासात काही दिवस विशेष ठरतात. यावर्षीचा २ ऑक्टोबरचा दिवस हा एक विलक्षण संगम घेऊन येतो – धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा, महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती. एकाच दिवशी आलेला हा योगायोग हा केवळ कॅलेंडरचा खेळ नसून आपल्याला दिलेला प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन – समानता व करुणेचा धडा
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ साली” विजयादशमी दिवशी “धम्म दीक्षा घेतली व जगभराला करुणा, समता, बंधुता यांचा संदेश दिला. हा दिवस आपल्याला भेदभावमुक्त समाज घडविण्याची आठवण करून देतो. विद्यार्थी व समाजाने या दिवशी “मानवतेची भिंत” मजबूत करण्याचा निर्धार करावा.
दसरा – विजयादशमीचा उत्सव:-
दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर व प्रकाशाचा अंध:कारावर विजय. हा संदेश आजच्या काळात भ्रष्टाचार, अज्ञान, हिंसा यांसारख्या सामाजिक राक्षसांवर विजय मिळविण्यास प्रेरित करतो.
महात्मा गांधी जयंती – अहिंसा व सत्याचे शस्त्र:-
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जगाला दाखवले की सत्याग्रह व अहिंसा हीच सर्वांत मोठी शक्ती आहे. विद्यार्थ्यांसाठी गांधीजींचा संदेश म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा व आत्मबल. समाजासाठी त्यांचा संदेश म्हणजे – संघर्षांतही शांततेचा मार्ग निवडणे. शासन-प्रशासनासाठी गांधीजींचा आदर्श म्हणजे पारदर्शकता व जनतेच्या कल्याणाची बांधिलकी.
लाल बहादूर शास्त्री जयंती – साधेपणा व शौर्य
“जय जवान, जय किसान” या घोषवाक्याने शास्त्रीजींनी देशाला प्रेरित केले. शिस्त, संयम, प्रामाणिकपणा व साधेपणा ही त्यांची ओळख होती. शेतकरी व सैनिक या दोन स्तंभांवर देश उभा आहे हे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून परिश्रम व प्रामाणिकतेचे धडे घ्यावे.
या चार पर्वांचा सामूहिक संदेश
विद्यार्थ्यांसाठी : शिक्षणात प्रामाणिकपणा, परिश्रम, सत्य व अहिंसा अंगीकारा.
समाजासाठी : समता, करुणा, ऐक्य व सहिष्णुता या मूल्यांवर समाज उभारा.
शासन व प्रशासनासाठी :- जनतेसाठी पारदर्शक, जबाबदार व न्याय्य व्यवस्था उभी करा.
अपेक्षा:-
२ ऑक्टोबरचा हा योगायोग आपल्याला सांगतो की – धम्म, विजय, सत्य-अहिंसा व प्रामाणिकता या चार दिशांनी जर आपण चाललो, तर भारताला उज्ज्वल भविष्य नक्कीच गवसेल.
तथागतांचा संदेश करुणा,मैत्रीचा दीप,
डॉ.आंबेडकरांचा संकल्प समानतेचा रूप,
धम्मचक्र फिरुनी दिला नवा प्रकाश,
न्याय -अहिंसा घेऊन घडवू या इतिहास ….हीच अपेक्षा!
….. राहुल डोंगरे….
शिवाजी नगर,तुमसर. जि.भंडारा.
मो. न.9423413826






