आशाताई बच्छाव
पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार, लवकरच होणार नवा रेल्वे मार्ग, इथं 250 एकरांवर मेगा टर्मिनल!
पुणे निवासी संपादक उमेश पाटील
पुणे: पुणे शहर गेल्या काही काळापासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले आहे. आता एका नव्या रेल्वे मार्गामुळे वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन नवीन रेल्वे मार्गांची आखणी केली जात आहे. पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गातील तळेगाव ते उरुळी कांचन या 75 किलोमीटरच्या मार्गासाठी उरुळी कांचन येथे 250 एकरांवर (100 हेक्टर) मेगा टर्मिनल उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिलीये.कसा असेल रेल्वे मार्ग?
पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग तळेगावपासून चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास आणि अहिल्यानगर असा असणार आहे. यामध्ये एकूण 8 रेल्वे स्टेशन असणार आहेत. याचा चाकण, शिक्रापूर, रांजणगाव आणि अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा 75 किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येईल.रेल्वे विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. हा रेल्वे मार्ग पुढील 4 वर्षात पूर्ण करण्यात येणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, हा रेल्वे मार्ग सोलापूर मार्गाला जोडण्यात येणार असून त्यासाठी भूसंपादन करण्यात यावे, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. तसेच तळेगाव येथे न्यू तळेगाव आणि उरुळी कांचन येथे देखील नवीन स्टेशन उभारले जाणार आहे.