राजेंद्र पाटील राऊत
“कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाने पटकावला राज्यस्तरीय कर्मवीर काव्य करंडक” निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव येथे शिक्षणमहर्षी भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कर्मवीर काव्य करंडक कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाने पटकावला आहे. स्पर्धेची सुरुवात कर्मवीरांच्या जन्मभूमीतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव मा.डॉ. व्ही. एस.मोरे यांच्या हस्ते झाले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे कार्य महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाचे आहे.अशा या महान नेत्यांच्या जन्मभूमीत काव्य करंडकाचा राज्यस्तरीय उत्सव सलग पाच वर्षांपासून होतो आहे याचा सार्थ अभिमान आहे.कविता माणसाला आनंद देते.काव्य निर्माण होण्यासाठी प्रतिभा असावी लागते ती आपल्याकडे आहे म्हणून आपल्या हातून काव्य निर्मिती होते.असे गौरवोद्गार नवोदित कवीविषयी त्यांनी काढले. तर समारोपात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ग्रामीण कवी इंद्रजित भालेराव यांनी प्रामाणिकपणे कविता लिहून ती सादर करणे याचा सारखा आत्मिक आनंद दुसरा कुठलाच नाही. स्पर्धा ही फक्त कवितेचीच नसते तर ती सादरीकरणाची सुध्दा असते. त्यामुळे कवीने आपली प्रकृती ओळखून कविता लिहावी. खरेतर कविता ही लिहावी लागत नाही तर ती जन्मावीच लागते. जे काही करायचे ते आत्मियतेने केले म्हणजे त्या, त्या परिस्थितीत आपण सरस ठरतो. असे प्रतिपादन करून त्यांनी “शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथे राबतो,कष्टतो माझा शेतकरी बाप”, “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता” अशा काही कविता सादर करून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.अध्यक्षीय मनोगतात महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थेचे समन्वयक मा.डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम राबवावा म्हणून कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जन्मदिनी व जन्मभूमीत राज्यस्तरीय “कर्मवीर काव्य करंडक” ही स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कुठल्याही काव्य स्पर्धेत नसेल एवढे पारितोषिक या स्पर्धेतील विजेत्यांना दिले जातात. राहील त्याचे घर व कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा करून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका भाऊसाहेबांनी केली. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थेने ग्रामीण भागातील वाडी पाड्यावर शिक्षणाची व्यवस्था केली आहे.असे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयात नव्यानेच पूर्णत्वास गेलेल्या २०० मिटर रनिंग ट्रॅकचे उद्घाटन
संस्थेचे समन्वयक मा.डॉ.अपूर्वभाऊ हिरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
स्पर्धेतील पारितोषिकं कनिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम पारितोषिक११,००० प्रफुल्ल तोताराम माळी (औद्योगिक शिक्षण संस्था धुळे) द्वितीय पारितोषिक ८००० पार्थ रामदास भिडेकर ( फर्ग्युसन महाविद्यालय पुणे) तर तृतीय पारितोषिक ५००० महेंद्र बानाजी कोळेकर (फर्ग्युसन महाविद्यालय पुणे)वरिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम पारितोषिक २१,००० रुपये भारतजीवन चारूदत्त प्रभूखोत (राजाराम महाविद्यालय कोल्हापूर) द्वितीय पारितोषिक रुपये १५,००० पियुष राजेंद्र लाड (भोसला मिलिट्री महाविद्यालय नाशिक) तर तृतीय पारितोषिक ११,००० मेघा सुनिल निकम (कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नांदगाव) यांनी पटकावले या स्पर्धेत परीक्षक म्हणून कवी कमलाकर देसले, कवी रविंद्र मालुंजकर, कवी राजेंद्र सोमवंशी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ.कल्याण कोकणे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.जी. शेवाळे आणि डॉ. गजानन भामरे यांनी केले महाराष्ट्राच्या नागपूर, रायगड, अहमदनगर, धुळे जळगाव, अकोला, औरंगाबाद अशा सर्वच जिल्ह्य़ातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली. कार्यक्रमास संस्थेतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.