राजेंद्र पाटील राऊत
तिवरींच्या झाडांची कत्तल केल्या प्रकरणी पंचनामा झाला मात्र पुढील कारवाई गुलदस्त्यातच!
पंचनामा सार्वजनिक करण्याची नागरिकांची मागणी!
पालघर(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)– पालघर तालूक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत समुद्र किनारी असलेल्या गट क्रमांक-1310 ला लागुन असलेल्या 1287 या वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवर जमिनीची साफ-सफाई करताना नरेंद्र दुबे यांनी तिवरींच्या झाडांची तोड केली होती.
या बाबत ग्रामपंचायत शिरगाव यांच्या वतीने कारवाई करण्या करीता पालघरचे तहसिलदार सुनिल शिंदे यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले होेते. त्याप्रमाणे 31 जानेवारी रोजी दुपारी उशीराने संबंधित सर्व विभागाचे प्रतिनिधी-अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसिलदार पालघर यांनी वस्तुस्थितीचा पंचनामा केला होता. त्यावेळी तिवरींच्या झाडांची व बंदी असलेल्या काही झाडांची कत्तल झाल्याचे पुरावे समोर आले होते. या वस्तुस्थितीचे चित्रीकरण ही करण्यात आले होते.
वस्तुस्थितीच्या पंचनाम्यावर उपस्थित नागरिकांच्या व जबाबदार अधिकार्यांच्या सह्या ही घेण्यात आल्या होत्या. मात्र पंचनाम्याची प्रत ग्रामपंचायती सह इतर कोणालाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे पुढील कारवाई होणार की नाही याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. तहसिलदार सुनिल शिंदे यांनी पत्रकारांनी या विषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, वस्तुस्थितीचा पंचनामा पंचासमक्ष केलेला आहे. कांदळवन संरक्षण समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर हे आहेत. त्यामुळे पुढील कारवाई ते करणार आहेत. प्रकरण त्यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सरपंच शिरगाव यांनी पंचनाम्याची प्रत स्थानिक ग्रामपंचायतीला देणे गरजेचे असताना ती दिलेली नाही. असे सांगितले. या प्रकरणावर तहसिलदारांनी व संबंधित विभागांनी कारवाई न केल्यास अश्या प्रकरणात प्रचंड वाढ होईल आणि त्यामुळे संपूर्ण समुद्र किनाराच धोक्यात येईल त्यामुळे कारवाई झालीच पाहीजे असे ग्रामपंचायतीचे उपसरपंच इमरान दांडेकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.