जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा भरावा.
-खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जिल्ह्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतीचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकट येत आहेत. या अतिवृष्टीने झालेले नुकसान लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाचा पिक विमा भरावा, असे आवाहन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण होत पाणी साचले आहे. खरीप पिकांचे यात प्रचंड नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणचे रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून खरीप पिके संरक्षित करण्याची गरज आहे. परंतु या वर्षी पिकविमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप हंगामात आतापर्यंत खूप कमी शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचा भविष्यातही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे असे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी पिक विमा भरणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा भरुन पिके संरक्षीत करुन घ्यावीत, असे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
दरम्यान शासन स्तरावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.