राजेंद्र पाटील राऊत
ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीत कोरोना उपचार केंद्र तत्काळ सुरू करण्याची डाँ.प्रसाद सोनवणेंची मागणी सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व परिसर गेल्या दोन महिन्यात कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे.रोज रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र कोरोना रुग्णांना उपचारासाठी स्थानिक पातळीवर उपचार केंद्र नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.सध्या रुग्णसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यात रुग्ण दगावल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत.अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी स्थानिक पातळीवर उपचार केंद्र सुरू होणे गरजेचे बनले आहे.कोरोणा रुग्णांना चाचणी सकारात्मक आल्यास त्वरित उपचार केंद्रात दाखल केल्यास कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढून कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होणार आहे.
आयुष्मान भारत योजना अंतर्गत गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान यांचे काम सुरू होते. ते काम पूर्ण होऊन बराच कालावधी लोटूनही या इमारती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने कोट्यवधी रुपये खर्चाच्या इमारती ‘ शो पिस ‘ बनल्या आहेत.विशेष म्हणजे कोरोनाच्या महाभयंकर साथीत शासनाच्या या इमारती वापराविना पडल्या आहेत हे विशेष.
ताहाराबाद व परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव बघता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत कोरोना उपचार केंद्र तत्काळ सुरू करून याठिकाणी ऑक्सीजन बेड सह सर्व सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात अपूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांची त्वरित नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून रुग्णांना उपचारासाठी अडचण निर्माण होणार नाही.