बंगला पहायचं शहीद संग्राम पाटील यांचे स्वप्न अपूर्णच
कोल्हापूर : जिल्ह्यात आणखी एका जवानाला सीमेवर देशाचं रक्षण करत असताना वीरमरण आलं. संग्राम शिवाजी पाटील असं शहिद झालेल्या जवानाचं नाव आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा या मूळगावी संग्राम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या वेळी सीमेवर आमच्या अजून किती जवानांचं रक्त सांडायचं असा सवाल करण्यात आला. संग्राम हे 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे जवान होते. येत्या मे महिन्यात ते निवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर गावात आपला एक छोटासा बंगला असावा असं स्वप्न संग्राम यांनी पाहिलं होतं. मात्र, संग्राम यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलंय. संग्राम यांच्या मागे आई-वडिल, भाऊ-बहिण, पत्नी आणि दोन चिमुकली मुलं आहेत.
यात मोठा मुलगा 8 वर्षांचा आहे तर मुलगी 3 वर्षांची आहे.
खूप गरीबीतून आई-वडिलांनी संग्राम यांना मोठं केलं. मात्र, चांगले दिवस येत असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला. याआधी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं. त्यानंतर लगेच संग्राम हे देखील देशासाठी शहीद झाले. त्यामुळं पाकिस्तानचा एकदाच निकाल लावून टाकावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी शहिद संग्राम पाटील अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
गेल्या बुधवारीचं संग्राम यांचा भाऊ संदीप यांना फोन आला होता. घराच्या बांधकामाचं कसं काय चाललं आहे? कोण-कोणती कामं अजून बाकी आहेत? शेतातील कामाचं काय झालं? अशी सगळी चौकशी संदीप यांच्याकडे केली होती. इतकंच नाही तर मी सुट्टीला आल्यानंतर राहिलेलं कामं करु. इतर पै पाहुण्यांकडे जाता येईल असं बोलणं संदीप यांच्यासोबत झालं होतं. मात्र, घराचं स्वप्न पूर्ण न होताच दादा गेला असं सांगून संदीप यांनी हंबरडा फोडला.