आशाताई बच्छाव
मराठ्यांची वाघीण – शालिनीताई पाटील यांचे दुःखद निधन. मुंबई विजय पवार प्रतिनिधी
जुन्या पिढीतील अभ्यासू, कणखर, दूरदृष्टी असलेलं आणि मूल्यनिष्ठ नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं.
मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर ठाम व निर्भीड भूमिका घेणाऱ्या माजी मंत्री, मराठ्यांची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शालिनीताई पाटील यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या काही काळापासून आजारी होत्या.
सहकारमहर्षी व माजी मुख्यमंत्री ना. वसंतदादा पाटील यांना राजकीय पटलावर ठाम, निष्ठावान आणि कणखर साथ देणाऱ्या शालिनीताई पाटील यांनी राजकारणात एक सक्षम आमदार व मंत्री म्हणून आपला ठसा उमटवला.
ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महाराष्ट्राच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली.
मराठा आरक्षणासह गुणवत्तेवर व आर्थिक निकषांवर आधारित सामाजिक न्यायासाठी त्यांनी एके काळी ठोस आणि प्रामाणिक लढा उभारला.
मात्र जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत संघर्ष करावा लागला, हे त्यांच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे प्रतीक होते.
माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेसमान मान देत सदैव आदर व साथ दिली.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख “महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण” असा केला होता—जो त्यांच्या धाडसी आणि निर्भीड नेतृत्वाचा गौरव होता.
त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे.
नावाप्रमाणेच शालीन, शांत, सुसंस्कृत, तत्वनिष्ठ आणि संघर्षशील नेतृत्व पुन्हा होणे दुर्मिळ आहे.
शालिनी ताई पाटील यांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन युवा मराठा परिवाराच्या वतीने
भावपूर्ण श्रद्धांजली…






