आशाताई बच्छाव
राजोली येथे तालुकास्तरीय बाल संमेलन उत्साहात संपन्न!
गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली:धानोरा तालुक्यातील राजोली येथे आयोजित तालुकास्तरीय बाल संमेलनात आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी चिमुकल्या दोस्तांशी मनमोकळा संवाद साधत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली मोठी स्वप्ने आणि निरागस प्रश्न पाहून मन भरून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बालकांशी झालेल्या गप्पांमधून शिक्षण, कला आणि क्रीडा हे यशाचे महत्त्वाचे मार्ग असल्याचे अधोरेखित करत, आपल्या भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम संधी व योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा विश्वास आमदार डॉ. नरोटे यांनी व्यक्त केला. “हा स्नेह कायम राहो,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांशी असलेले नाते अधिक दृढ केले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. मनोहरजी पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. लताताई पुन्घाटी, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, गटशिक्षणाधिकारी सौ. हेमलताताई परसा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून, या संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






