Yuva maratha news
मालेगावात महिला कर्मचाऱ्यांचा छळ झाल्याच्या तक्रारी,नंतर सारेच आलबेल!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यालय जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयातील महिलांच्या लैंगिक छळाचे प्रकरण ताजे असतानाच व मंत्री अधिका-यांचे हनी ट्रँप प्रकरण देखील रोजच चर्चेत असताना , आता मात्र मालेगाव पंचायत समितीच्या शिक्षण व ग्रामपंचायत विभागात महिला कर्मचाऱ्यांचा छळ झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,गत अकरा दिवसांपूर्वी एका राज्यस्तरीय वृत्तपत्रातून या घटनेचा भांडाफोड करण्यात आला आहे.पंचायत समितीच्या शिक्षण व ग्रामपंचायत विभागात घडलेल्या या प्रकाराबाबत विशाखा समितीकडे दाखल असलेल्या तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
यानिमित्ताने पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील “थोर “प्रतापाची तालुकाभर जोरदार कर्णापकर्णी चर्चांना उधाण आले आहे.शिक्षण विभागातील एका शिक्षणविस्तार अधिकारी व मुख्याध्यापका विषयी तर ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिका-याविरोधात विशाखा समितीकडे तीन तक्रारी दाखल झालेल्या होत्या, मात्र कार्यवाही करण्याकामी राजकीय दबाव येत असल्याच्या कारणातून महिलांनी पुरावे देण्यास नकार दिल्याने सदरच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे विशाखा समिती अध्यक्षा तथा तालुका पशूधन अधिकारी डॉ.मयुरा अरबट यांनी सांगितले.शिक्षण विभागातील मुख्याध्यापकाचे प्रकरण तडजोडीअंती मिटल्याचे कळते तर शिक्षण विस्तार अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्याने केलेल्या छळाचे प्रकरण संपल्यात जमा झाल्याची एकंदरीत चर्चा असली तरी ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिका-यांच्या महिला छळवादाच्या प्रकरणाचे पुढे नेमके काय झाले? याबाबत नागरिकात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
“युवा मराठा” च्या पाहणीनंतर तक्रार पेटी लावली! “युवा मराठा” न्यूजच्या टिमने व विराणे येथील सरपंच नंदकुमार सोनवणे यांनी पंचायत समितीला भेट दिल्यावर विशाखा समितीच्या पदाधिकारीचा नामोल्लेख असलेला फलक कुठेही दर्शनी भागात लावलेला नसल्याचे आढळून आले.तर महिलांसाठी असलेली तक्रार पेटीही कार्यालयीन अधीक्षक यांच्या दालनात एका कोपऱ्यात ठेवण्यात आल्याचे विदारक दृश्य व सत्यता आढळून आली.”युवा मराठा”च्या भेटीनंतर काही क्षणातच तक्रार पेटी लावण्यात आल्याने समाधान व्यक्त केले गेले तर “युवा मराठा”चे भरभरून कौतुक करण्यात आले आहे.






