आशाताई बच्छाव
आदिवासी वनहक्क अभियानाला गती: शेवरे सह तीन गावांनी दाखवला पुढाकार ताहराबाद: प्रतिनिधी
छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने आणि कोरो इंडियाच्या सहकार्याने “आदिवासी वन हक्क अभियान” अंतर्गत, ग्राम पंचायत शेवरे येथील ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दावा दाखल करण्यासाठी ठराव एकमुखाने मंजूर केला. तर शेजारील पेसा अंतर्गत असलेल्या भिलवाड , माळवाडे या गावांतील नागरिकांकडून ठराव मंजुर व प्रक्रिया अंतिम टप्प्यात. या ठरावाच्या माध्यमातून ग्रामसभेने वनहक्क कायदा २००६ आणि पेसा कायदा १९९६ अंतर्गत आपला ऐतिहासिक अधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी अधिकृत निर्णय घेतला. यावेळी ग्रामसभेत ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ठरावामध्ये गावाच्या सीमा, ऐतिहासिक वापर, जंगलाच्या संसाधनांवरील पारंपरिक हक्क, आणि प्रशासनास सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची माहिती नमूद करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात, सर्वेक्षण, नकाशे तयार करणे, आणि कागदपत्रे संकलन यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या उपक्रमाला छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था मार्गदर्शन करत असून, गावकऱ्यांमध्ये वनहक्काबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि सशक्त सहभागासाठी प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे आदिवासी समाजाचा आपल्या जंगलावरचा पारंपरिक हक्क कायदेशीररित्या सिध्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी वनविभागाच्या वतीने मा. गायकवाड साहेब यांनी सामूहिक वनहक्क आणि गावातील ग्रामस्थांचे कर्तव्य समजावून सांगितले..तर ग्राम विकास अधिकारी सविता खैरनार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील कामाचा अनुभवाचा दाखला देत आदिवासी विकासासाठी वनोपज, वनऔषधी वनस्पती उद्योगातूनही ग्राम विकास होतो हे उदाहरणे देऊन नागरिकांना आव्हान करून सहकार्यचे आश्वासन दिले.. कोरो इंडिया चे सचिन फटकळ आपलं मत मांडताना आदिवासी संस्कृती आणि बोलीभाषा टिकली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले.. आभार प्रसंगी बोलताना शाहू संस्थेचे सिद्धार्थ पानपाटील यांनी आदिवासी सामूहिक वन हक्क” म्हणजेच आमच्या जंगलावर आमचा हक्क! शेकडो वर्षांपासून आमच्या पिढ्या जंगलावर अवलंबून आहेत. हे जंगल आमचं केवळ संसाधन नाही, तर आमचं संस्कृती, ओळख आणि आयुष्य आहे. पण अनेकदा हे हक्क आमच्याकडून हिरावले गेले. आता, वनहक्क कायदा २००६ आणि पेसा कायदा १९९६ आम्हाला परत आमचा अधिकार देतोय — पण त्या हक्कासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, ग्रामसभा मजबूत करावी लागेल, आणि स्वतःच्या अधिकारांची जबाबदारी घ्यावी लागेल. बागलाण मधील पेसा अंतर्गत गावाने जर सामूहिक वनहक्काचा अर्ज केला, तर आपल्याला या आपल्या जंगलावर व्यवस्थापनाचा आणि वापराचा अधिकार मिळतो, त्यातून गावाच्या उत्पन्नात वाढ होते, महिला, युवक, शेतकरी यांना स्वावलंबी रोजगार निर्माण करता येतो. ही केवळ एक कागदोपत्री प्रक्रिया नाहीतर, ही आहे “आपल्याला स्वतःच्या भविष्यासाठी उभं राहण्याची एक संधी”!. म्हणून या अभियानात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. महिला जंगलाच्या खऱ्या व्यवस्थापक आहेत. युवकांकडे ऊर्जा आणि नवे विचार आहेत. सरपंच, ग्रामसेवक आणि वनहक्क समीती यांच्यावर कायदेशीर जबाबदारी आहे. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे ग्रामसभा मजबूत करायची आणि एकत्र निर्णय घ्यायचे. आपण या अभियानाची सुरुवात केली आहे, पण हे केवळ एक प्रकल्प नाही. हे आहे आमचं हक्क परत मिळवण्याचं आंदोलन !
चला, सगळ्यांनी हातात हात घालूया आणि म्हणूया
“आमचं जंगल – आमचा हक्क!” “ग्रामसभा सर्वोच्च आहे!” “पेसा कायदा लागू करा!” घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.. प्रस्तावना फेलो महेंद्र पवार यांनी केले तर सुत्रसंचलन चंद्रशेखर वाघमारे यांनी केले प्रसंगी ग्राम पंचायत शेवरे पदाधिकारी व कर्मचारी, भिलवाड, माळवाडे, देवठाण या गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :-
“छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने वनहक्क प्रक्रियेचा प्रारंभ”