आशाताई बच्छाव
गडचिरोलीत वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर आज गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली व पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना निवेदन देऊन अपघात नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात अपघातांची संख्या चिंताजनक रित्या वाढली असून, अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गंभीर परिस्थितीला प्रशासनाने गांभीर्याने घेत तात्काळ पुढील उपाययोजना कराव्यात, असे आमदार नरोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे:
अवजड वाहने व ट्रक यांना वेगमर्यादेचे कठोर पालन बंधनकारक करावे
महामार्ग व मुख्य रस्त्यांवरील अवैध पार्किंग हटवून अधिकृत पार्किंगची व्यवस्था करावी
गर्दीच्या वेळेत वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणात ठेवावी
अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी
स्पीड गन, ड्रायव्हर टेस्ट व ब्रेथ अॅनालाईझर यंत्रणा प्रभावीपणे वापराव्यात
वाहनचालकांसाठी जनजागृती व प्रशिक्षण मोहीम राबवावी
अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती प्रशासनिक कार्यवाही करावी
गडचिरोली शहरात व जिल्हाभरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी व ते २४ तास कार्यरत राहतील यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी
“गडचिरोलीतील जनतेचे प्राण वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे आवाहन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी केले.
या निवेदनप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. अनिल तिडके, भाजयुमो जिल्हा महामंत्री श्री. मंगेश रणदिवे, शिवसेना जिल्हा संयोजक श्री. हेमंत जम्बेवार, भाजपा शहराध्यक्ष श्री. अनिल कुनघाटकर, भाजयुमो शहराध्यक्ष श्री. विशाल हरडे, श्री. विजय कृपाकर, श्री. आशिष मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






