आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांनो, बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगा !
कृषी अधिकारी बनसोडे यांचे आवाहन : फसवणूक टाळा
स्वप्निल देशमुख
संग्रामपूर : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना बाजारात विविध कंपन्यांच्या आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून बनावट बियाण्यांची विक्री वाढत आहे. अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सजग राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कृषी विभागाशी संपर्क साधून सुधारित व संकरीत वाणांची माहिती घ्यावी आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. बियाणे खरेदी करताना टॅगवरील माहिती- पिकाचे नाव, वाण, बॅच क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण
क्षमतेची टक्केवारी, विक्रीची किंमत, विक्रेत्याची सही इत्यादी तपासून पाहणे अत्यावश्यक आहे. बियाणे खरेदीची पक्की पावती अवश्य घ्यावी आणि त्यावर शेतकऱ्याचे नाव, पिकाचे नाव, वाण व विक्रेत्याची सही यांची नोंद असावी. मुदतबाह्य अथवा पॅकिंग फाटलेली बियाणे खरेदी करू नये. भविष्यात बियाणात दोष आढळल्यास ही नोंदी तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक ठरतात. बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालून छिद्र करून काही बियाणे वेगळे ठेवावे. उर्वरित पिशवी व टॅग सुरक्षित ठेवावे. बियाणे कायदा १९६६ अंतर्गत दोषी विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई शक्य आहे.
आर्थिक नुकसान झाल्यास जिल्हा ‘ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून भरपाई मिळवता येते. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले