आशाताई बच्छाव
25 एप्रिलला सरपंच पदाची सोडत ; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार 25 एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 दरम्यान नांदेड जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण लागू असणार आहे.
नांदेड जिल्हयातील सर्व 16 तालुक्यामध्ये शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी तहसिल स्तरावर प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार यांच्याद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ना.मा.प्र पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदाकरिता सोडत कार्यक्रम संबंधित तहसिलदार यांच्या अधिपत्याखाली संबधीत तालुक्यांच्या उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणात पुढील प्रमाणे पार पडणार आहे. सर्व संबंधित नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी सदरचे सोडतीस उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ना.मा.प्र. पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदासाठी हे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. आरक्षणासाठी सोडत पुढीलप्रमाणे असेल. नांदेड व अर्धापूर तालुका उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार नांदेड व अर्धापूर यांच्या कार्यालयात अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. भोकर व मुदखेड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या नियंत्रणात भोकर व मुदखेड येथे तहसिल कार्यालयात अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या नियंत्रणात हदगाव व हिमायतनगर तहसिलमध्ये अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. किनवट व माहूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या नियंत्रणात किनवट व माहूर येथे अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. धर्माबाद व उमरी तहसिलसाठी उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या नियंत्रणात तहसिल धर्माबाद व उमरी येथे अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा., बिलोली व नायगाव खै. तहसिलसाठी उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार बिलोली तहसिलदार नायगाव खै. तहसिलसाठी अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा., देगलूर व मुखेड तहसिलसाठी उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्या नियंत्रणात तहसिलदार देगलूर व मुखेड येथे अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा., कंधार व लोहा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या नियंत्रणात तहसिल कंधार व लोहासाठी अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. आरक्षणाची सोडत निघणार आहे. सर्व सोडती 25 एप्रिल रोजी सकाळी 10 व दुपारी 3 वा. त्या-त्या तहसिलमध्ये होणार आहेत.