
आशाताई बच्छाव
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे वतीने रमजान ईद निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
संजीव भांबोरे
तळा – तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक विद्यामंदिर, गो म वेदक विद्यामंदिर आणि कला- वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना रमजान ईद निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, वरचा मोहल्ला अध्यक्ष दिलावर खाचे, पट्टीवाला मोहल्ला अध्यक्ष मोहम्मद खान पठाण, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे, शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक दयानेकर बी एन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बंधू व भगिनींना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांनी रमजान ईद का साजरा करण्याचे महत्व सांगून डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन केले. या संस्थेत विविध धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्वांना समान वागवले जात असल्याचे प्रतिपादन केले. शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे यांनी मुस्लिम धर्मातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस , सैनिक आदी क्षेत्रांत करिअर करून आपले आई बाबा, गाव व शाळेचे नाव रोशन करावे असे आवाहन केले व आपण सर्व एकच असून जात व धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत व सहकार्य करूया असे प्रतिपादन केले. वरचा मोहल्ला अध्यक्ष दिलावर खाचे यांनी रमजान ईदच्या निमित्ताने या संस्थेत शैक्षणिक साहित्याचे वाटप हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केल्याने संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांना धन्यवाद दिले. संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताचा संदर्भ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी प्रत्येकानी आपापला धर्म पाळावा, कोणीही इतर धर्माचा तिरस्कार करू नये, सर्व धर्माचा आदर करावा व घराचा उंब्रहाटा ओलांडल्यानंतर आपला धर्म बाजूला ठेवून मनुष्य हाच धर्म पाळावा असे सांगितले. अरीफा गोठेकर या विद्यार्थिनीने तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलात सर्वधर्म समभावाचे कार्यक्रम आयोजित केले जातात म्हणून आम्ही या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सर्जे व्ही बी यांनी केले. यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.