आशाताई बच्छाव
भिमराव विक्रम मगरे: प्रेरणादायी शिक्षक आणि सामाजिक जाण असणारे गुणवंत व्यक्तिमत्त्व
मालेगाव तालुक्यातील दयाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेले भिमराव विक्रम मगरे सर हे एक नाविन्यपूर्ण विचारसरणी असलेले, प्रामाणिक आणि प्रेरणादायी शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांचा शैक्षणिक व सामाजिक प्रवास केवळ विद्यार्थ्यांच्या यशापर्यंत सीमित नसून, समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
प्रारंभिक जीवन व शैक्षणिक वाटचाल
भिमराव मगरे सरांनी विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीला वैद्यकीय शिक्षण घेण्याचा त्यांचा विचार होता, परंतु शिक्षकी पेशाची आवड आणि समाजसेवेची जाणीव यामुळे त्यांनी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला. डी.एड. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात झेडपी शाळेत झाली.
त्या भागातील आदिवासी पावरा बोलीभाषा त्यांनी शिकून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ज्यामुळे तेथील विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वासाला पात्र ठरले. मगरे सरांचे प्रेमळ स्वभाव आणि मेहनती वृत्तीमुळे ते त्या भागात लाडके शिक्षक बनले.
नंतर सुरगाणा पेठ विभागात त्यांची बदली झाली. घरापासून 3-4 किलोमीटर अंतर पायी प्रवास करत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सतत मेहनत घेतली. त्यावेळेस दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचे कार्य त्यांनी केवळ प्रयत्नशीलतेने केले नाही, तर तो त्यांचा ध्यासच बनला.
दयाणे येथील कार्यकाल आणि योगदान
करोनाच्या काळात दयाणे येथील शाळेत रुजू झाल्यावर त्यांनी शाळेतील विविध समस्या ओळखून त्यावर काम सुरू केले. सामाजिक संस्थांचे आणि दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळवून त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या-पुस्तके, शालेय साहित्य यांची पूर्तता केली.
संगणक दान: पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते शाळेला संगणक भेट मिळवून दिला.
स्वच्छ पाणी: विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी मनीष अप्पांनी Aquaguard उपलब्ध करून दिला.
स्मार्ट टी.व्ही. संच: दीपकदादा शिंदे यांनी शाळेला 55 इंचाचा स्मार्ट टी.व्ही. दिला.
योग व शारीरिक शिक्षण: डॉक्टर उज्वल कापडणीस यांनी सर्व विद्यार्थ्यांना टी-शर्ट व योग प्रशिक्षणाची सुविधा दिली.
अनाथ व गरीब विद्यार्थ्यांसाठी आधार: अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय त्यांनी निर्णय त्यांनी घेतला.
मगरे सरांचा जीवनप्रवास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित आहे. ते फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा चालवत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.
ते मालेगावातील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांशी संबंधित असून, राष्ट्रपुरुषांच्या जयंती व धार्मिक उत्सवांमध्ये नेहमी अग्रेसर असतात.
पुरस्कार आणि सन्मान
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे:
दुर्योधन एकलव्य शिक्षक पुरस्कार (राज्यस्तरीय)
आदर्श शिक्षक पुरस्कार – दैनिक बालकिल्ला
विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कार – समता परिषद (2018)
पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
गरीब, अनाथ विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारे मगरे सर केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर सामाजिक नेतृत्वकर्ता म्हणूनही ओळखले जातात
भिमराव विक्रम मगरे सर हे शिक्षकतेची मूर्ती आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. त्यांचे कार्य शिक्षक, पालक आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
. .✍️…..रविंद्र जी.ढोडरे