आशाताई बच्छाव
नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमधील मुलींना मिळणार मोफत सायकल
सतीश सावंत : विभागीय प्रतिनिधी
नाशिक : मानव विकास मिशन अंतर्गत अतिमागास जिल्ह्यांतील काही ठराविक तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण व उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजने अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकलचे वाटपही केले जाते. आदिवासी भागात आणि खेड्या पड्यांवर राहणाऱ्या मुली प्रवासाचे साधन नाही. यामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा यामागील उद्देश आहे. यात नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश असून, या तालुक्यांमधील आठवी ते बारावीच्या पात्र विद्यार्थिनींना सायकल मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे.
नेमकी काय आहे योजना?
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसूल, इगतपुरी, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर या निश्चित केलेल्या आठ तालुक्यांमधील शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर वास्तव्यास असणाऱ्या आठवी ते बारावीच्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलींना मानव विकास कार्यक्रमांतर्गत या मुलींना मोफत सायकलींचे वाटप केले जाते. २०११ पासून ही योजना सुरू असून, या अंतर्गत मुलींना सायकल वाटप केले जाते. मागील सात वर्षात ३१ हजार ५६८ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळाला असून, यावर्षीही यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
... असा मिळतो लाभ
विद्यार्थिनींची यादी मिळाल्यानंतर त्यानुसार राज्य सरकारकडून पात्र विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर निधीचा पहिला हप्ता पाठवला जातो. यानंतर सदर विद्यार्थिनींना सायकल खरेदी करून पावती सादर करावी लागते. त्यानंतर उरलेली रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवली जाते. प्रत्येक तालुक्यातून चारशे विद्यार्थिनींची यासाठी निवड केली जाते. संख्या वाढल्यास सरकारकडून अधिकचा निधीही मागवला जातो.
अशी केली जाते योजनेची अंमलबजावणी
प्रत्येक तालुका स्तरावरून मानव विकास या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांकडे या योजनेसाठी पात्र विद्यार्थिनींची संख्या व माहिती मागवली जाते. त्यानुसार शाळेपासून पाच किलोमीटरवर वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनींची यादी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठविली जाते. माध्यमिक शिक्षण विभागाकडून मानव विकास समितीकडे ही माहीती जाते. या समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य आठ सदस्य असतात.