
आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांना खते व बियाणे चडया दराने विक्री करण्याऱ्या कृषी सेवा केंद्राची झाडाझडती
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड मुखेड -खरीप हंगामामध्ये बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी कृषीसेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. खरेदी दरम्यान कापूस बियाणे व काही ठराविक खते वाढीव दराने विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारी काही संघटना तसेच शेतकऱ्याकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमिवर तहसीलदार राजेश जाधव व तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांच्या भरारी पथकाकडून कृषीसेवा केंद्राची तपासणी करुन झाडाझडती घेण्यात आली.
मुखेड तालुक्यात शेतकऱ्यांना कापूस बियाणे व काही ठराविक खते वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आणि माध्यमांतील बातम्यांद्वारे बाहेर आल्यानंतर कृषी विभागाचे भरारी पथक व तहसीलदार राजेश जाधव यांनी कृषी दुकानाची तपासणी केली. कृषी दुकाना समोर खरेदीसाठी उभे असलेल्या शेतकऱ्यांना बिलापेक्षा वाढीव रक्कम दुकानदार घेत आहेत का याबाबत विचारणा केली. तालुक्यातील कोणत्याही कृषीसेवा केंद्र दुकानदारांनी खरेदी किमतीपेक्षा जास्त वाढीव पैसे घेत असल्यास
थेट तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, मुखेड येथील ज्ञानेश्वरी कृषी सेवा केंद्र, सुनील कृषी सेवा केंद्र, बालाजी कृषी सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तपासणी करण्यात आली. सदर पथकात तहसीलदार राजेश जाधव, तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, देगलुर पंचायत समितीचे कृषी अधिकारी लहाने, कृषी सहाय्यक दिगांबर शेटवाड, कृषी सहायक महादेव शिंदे, तलाठी जि.डी. कल्याणकर यांचा सहभाग होता. यावेळी मोठ्या संख्येने कृषीसेवा केंद्रासमोर शेतकरी उपस्थित
होते. खते व बियाणे खरेदी करताना नोंदणीकृत दुकानदार यांच्याकडूनच खरेदी करावी व खरेदी केलेल्या बिलापेक्षा अधिकची रक्कम दुकानदार मागत असल्यास तशी लेखी अथवा फोनद्वारे तालुका कृषी अधिकारी यांना तक्रार नोंदवावी किंवा आपल्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवावी तसेच पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी केले आहे.
मुखेड तालुक्यातील बा-हाळी व चांडोळा महसूल मंडळ सोडता इतर महसूल मंडळात पेरणी योग्य अजूनतरी पाऊस नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्याशिवाय म्हणजेच ९० ते १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करू नये पेरणी करण्यासाठी घाई करू नये असे आवाहान तालुका कृषीधिकारी विकास नारनाळीकर यांनी केले आहे.