आशाताई बच्छाव
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024
18-जालना लोकसभा मतदारसंघ
निवडणूक निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंगरूमची पाहणी
परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे दिले निर्देश
जालना, (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :- जालना लोकसभा मतदारासंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी शुक्रवारी (दि.3) जालना एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुमची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध बाबींची तपासणी करून केलेल्या योग्य नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे कौतुक केले. मतदान यंत्र या स्ट्राँगरुममध्ये ठेवल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा स्ट्रॉंग रूम नोडल ऑफिसर सोहम वायाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, बालकामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजपूत हे उपस्थित होते.
श्रीमती मार्टीन यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था असल्याची पाहणी करून खात्री केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेला परिसर सुरक्षित करण्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी सर्वांसोबत त्यांनी चर्चा करून सर्व नियोजन व्यवस्थित करण्याची सूचना केली. सुरक्षा व्यवस्थे संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करून पुढील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.