
आशाताई बच्छाव
आंतरराष्ट्रीय महिला दिवस
महिला दिन हा जगातल्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे.जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे.ब-याच ठिकाणी आजही महिला उपेक्षित आहेत.समाज, घरातील लोक महिलांमध्ये कर्तृत्व असूनही त्यांना पुढे जाण्याची संधी देत नाही असे कित्येक घरांमध्ये आढळून येते.त्यामुळे तिच्यात असलेले सुप्त गुण प्रकट होत नाहीत.आपण म्हणतो की आपला समाज प्रगत झाला आहे.परंतु काही ठिकाणी आजही महिलांना उपेक्षा सहन करावी लागते.ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभीर्य जास्त असते.मुलींना लहानपणापासूनच जीवनाकडे गंभीरतेने बघण्याचे आणि जवाबदारीने वागण्याचे शिक्षण दिले जाते.तिच्याकडील गांभीर्य पुढच्या पिढीत उतरवण्याची जवाबदारी आपल्यावर आहे हेही सतत तिच्या मनामध्ये असतेच.हल्ली दहावी, बारावीच्या परीक्षेत मुली मुलांपेक्षा चांगले गुण घेऊन पास होतात.मुली घरकामात लक्ष घालूनही अधिक गुण मिळवतात.महिला दिनाची सुरूवात स्त्रियांच्या सामुहिक प्रयत्नांनी अमेरिकेत १९०८ रोजी करण्यात आली.काही उदाहरणे वगळता आपल्या देशातील महिलांना आज सर्व क्षेत्रांत पुरूषांच्या बरोबरीने समान संधी उपलब्ध होते आहे.महिला दिन फक्त एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता रोजच महिलांना सन्मानपूर्वक वागणूक समाजाने,घरच्यांनी देणे आवश्यक आहे.
असा काळ होऊन गेला जेव्हा पुरुषप्रधान संस्कृतीत असलेला स्त्रीचा दर्जा अतिशय खालावलेला होता.तिला फक्त घरची कामे करणे,चूल आणि मूल यातच ती गुरफटली होती.परंतु अशाही काळात जिजाबाईंसारख्या थोर मातेने आपल्या शिवबाच्या मनात स्वराज्याचे बीज पेरले व शिवाजी महाराज घडले.एके काळी स्त्रियांचे कार्यक्षेत्र फक्त घरापुरते मर्यादित होते.पुरूषप्रधान संस्कृतीमुळे फक्त पुरूषांचीच घरावर मक्तेदारी होती.स्त्रिच्या मतांना काडीचीही किंमत नव्हती.तिचे काम फक्त पुरूषांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे एवढेच होते.पूर्वी महाविद्यालयात जाणा-या स्त्रियांची संख्या अगदी नगण्य होती.कार्यालयात काम करणा-या महिला तर अगदी बोटावर मोजता येतील एवढ्याच असत.पण काळ बदलला तसे हे दृश्यही बदलले.आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करते आहे.स्त्रिया सर्व क्षेत्रांमध्ये समर्थपणे जवाबदा-या पेलताना दिसत आहेत.स्त्रीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे.तिला आपले छंद, ध्येय, आरोग्य इत्यादी जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी करून स्त्रियांना सशक्त केलं.म्हणून आज आपल्याला समाजात उच्चशिक्षित महिला दिसत आहेत.आज भारतात मुलींना मोफत शिक्षण मिळण्याची सोय सरकारद्वारे केली गेली आहे.नोकरीत स्त्रियांना राखीव जागा असतात.संपत्तीमध्येही तिला वारसा हक्क मिळतो.विविध स्त्री-मुक्ती संघटनांद्वारे स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली जाते.ज्या स्त्रिया विधवा,परितक्त्या,घटस्फोटीत, निराधार आहेत,अशा स्त्रियांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाते. ही मदत समाजातील सर्व धर्मांतील स्त्रियांसाठी खुली आहे.आजची स्त्री डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ,वकिल, आमदार, खासदार, अधिकारी अशा कितीतरी महत्वाच्या पदांवर काम करते.
ब-याचवेळा विवाहापूर्वी जोपासलेल्या कला, छंद, शिक्षण याकडे विवाहानंतर दुर्लक्ष केले जाते.घरच्या जवाबदा-यांमुळे विवाहानंतर स्त्री आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून केवळ चोवीस तासाची बांधील अशी चाकरमानी ठरते.कित्येकदा जवाबदारीच्या ओझ्याखाली दबल्यामुळे तिला मोठ्या पदाची नोकरी पात्रता असूनही नाकारावी लागते.काही स्त्रिया आज सार्वजनिक क्षेत्रात आपल्या कलागुणांमुळे प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि होत आहेत.तिला जगात घडणा-या घडामोडींची, आजूबाजूच्या परिस्थितीची पूर्ण जाण असते.मुलांचा अभ्यास घेणे,घरातील व घराबाहेरील कामे करणे, घरातील सर्वांच्या तब्येतीची काळजी घेणे,त्यांना काय हवं नको ते बघणे, ही सर्व कामे ती सहज पेलते.आजची स्त्री कधी पी.टी.उषा बनून धावते,कधी लता मंगेशकर बनून स्वरांवर अधिराज्य गाजवते,कधी द्रौपदी मुर्मू होऊन देशाचे नेतृत्व करू शकते,कधी मदर टेरेसा होऊन दु:खी असलेल्यांसाठी आशेचा किरण ठरते,तर कधी झाशीची राणी होऊन युध्दात लढण्यासाठी तयार असते.सामाजिक जडण-घडणीत आजच्या स्त्रिचा खूप मोठा वाटा आहे.मोठमोठ्या जवाबदा-या पेलण्याचे सामर्थ्य आजच्या स्त्रियांमध्ये आहे.तिचे घरातील व समाजातील स्थान अनन्यसाधारण आहे याची प्रचिती आज सर्वांनाच आलेली आहे.भारतात आज ८० टक्के स्त्रिया स्वातंत्र्य काळानंतर सुशिक्षित आहेत.त्या उच्चशिक्षणासाठी देशाबाहेरही जात आहेत.पूर्वी मुलींचे लग्न आई-वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या पसंतीने व्हायचे.आजच्या आधुनिक काळात मुलीलाही तिची पसंती विचारली जाते.महिलांवर होणा-या अत्याचारावर त्या आज ठामपणे बोलताना दिसतात.आजच्या स्त्रिया आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहेत यात तिळमात्र शंका नाही.आपणही पुरूषांप्रमाणे निरनिराळ्या क्षेत्रांत काम करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.असे एकही क्षेत्र नाही जिथे स्त्रीचा सहभाग नाही.
“अबला नहीं सबला है तू,नारी नहीं चिंगारी है तू” हे आजच्या स्त्रियांनी लक्षात ठेवले पाहिजे.समाजाने सुध्दा तिला साथ दिली पाहिजे.आजच्या स्त्रीला माझे कोटी कोटी नमन!
लैलेशा भुरे
नागपूर