आशाताई बच्छाव
ऑनलाईन ट्रांझ्याक्शन
आज मी शाॅपिंग करायला निघाले.मी माझ्या नव-याला म्हटले -“मी शाॅपिंगला जाते आहे.”त्याने मला एक नजर बघितले आणि म्हणाला -“बरं मग?” त्याच्या अशा बोलण्याच्या मला जरा रागच आला.मी म्हणाले -“मग काय, मला कॅश दे ना.”यावर तो म्हणाला -“हल्ली सर्व ट्रांझ्याक्शन पेटीएम,फोनपे,गुगलपे वर होतात.कशाला हवी तुला कॅश?”
खरं सांगू का…या ऑनलाइन ट्रांझ्याक्शनने आम्हा गृहिणींची पार वाट लावली आहे.आमचापण काही अधिकार होता तो पण आता मिळेनासा झालाय.यामुळे आम्हा बायकांना नव-याच्या खिशातील पैसे पण उडवता येत नाही.एवढेच नाही तर कपडे धुताना नव-याच्या खिशात सापडणा-या पैशांचा आनंदही घेता येत नाही.जेव्हा नव-याच्या खिशात पैसे सापडायचे, तेव्हा कोण आनंद व्हायचा.काहीतरी तीर मारल्याची भावना असायची.(याला पैसे चोरणे म्हणत नाही बरं का) त्यावेळी आम्ही बायका एटीएमपेक्षा स्वतःला कमी समजत नव्हतो.पण या एटीएमच्या जमान्यात हा गर्व,हा आनंद सर्वकाही संपले.आजच्या काळात कितीही एटीएम असले तरी माझ्यासारख्या गृहिणींसाठी तर नवराच एटीएम होता, आहे आणि राहणार.
लैलेशा भुरे
नागपूर