आशाताई बच्छाव
आत्मविश्वास
स्वतःवर असलेल्या विश्वासाला आत्मविश्वास म्हणतात.कोणतेही काम करण्यासाठी, कुठलीही जबाबदारी पार पाडण्यासाठी व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असणे फार महत्वाचे आहे.आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस कुठल्याही कामात यश प्राप्त करू शकतो.आत्मविश्वास यशाची सर्वात मोठी संपत्ती आहे.जिच्यात आत्मविश्वास असतो अशी व्यक्ती कुठलेही काम सहज करू शकते.स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी आत्मविश्वासाची नितांत गरज असते.आत्मविश्वासामुळे माणसाच्या चेहऱ्यावर तेज झळकतं.आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती अपयशातून यश मिळवू शकते.आत्मविश्वासू लोक हुशार असतात.यश मिळवण्यासाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही.स्वत:च्या क्षमतेवर ते सर्व कार्य पार पाडतात.
आत्मविश्वास जरूर असावा,पण अति आत्मविश्वास नको.अति आत्मविश्वासामुळे अनेकदा तोटाही संभवतो.कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.”अती तेथे माती” म्हणतात ते योग्यच आहे.अति आत्मविश्वासामुळे आपण कुणाचे ऐकत नाही.आपल्याला आपलेच खरे वाटते.त्यामुळे तोटा होण्याची शक्यता असते. आत्मविश्वास यश मिळवण्यासाठी महत्वाचा आहे.स्वत:वर असलेल्या विश्वासामुळे लोक चांगले निर्णय घेऊ शकतात.त्यामुळे जीवनात यश संपादन करण्याची क्षमता वाढते.याउलट आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीला प्रत्येक काम अडचणीचे वाटते.त्यांना यश मिळवणे कठीण जाते.माणसाला स्वतः:च्या अनुभवातून आणि निर्णयातून आत्मविश्वास मिळतो.वैयक्तिक विकास साधणे आत्मविश्वासामुळे शक्य होते.जोपर्यंत आपण कंफर्ट झोनच्या बाहेर पडत नाही, तोवर आत्मविश्वास वाढत नाही.कंफर्ट झोनमधून बाहेर पडल्याने नवीन गोष्टी शिकून त्या अनुभवातून आत्मविश्वास वाढतो.नेहमी सकारात्मक व्यक्तींच्या सानिध्यात राहिल्यानेही आत्मविश्वास वाढतो.त्यामुळे नकारात्मक वृत्तीच्या लोकांना शक्यतोवर टाळावे.आपले कर्तृत्व छोट असो वा मोठे,त्याचा नेहमी अभिमान बाळगा.स्वत:शी दुसऱ्यांशी तुलना कधीच करू नये.प्रत्येकजण वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रश्न, समस्या वेगवेगळ्या असतात.आत्मविश्वासामुळे माणूस परिपूर्ण जीवन जगू शकतो.ध्येय निश्चित करून त्यासाठी कार्य करणे महत्त्वाचे आहे.आव्हाने स्विकारण्याची, जोखीम पत्करण्याची आणि आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या आपल्या क्षमतेमागे आत्मविश्वासच असतो.जे-जे जीवनात घडेल त्याला योग्य त-हेने हाताळून पुढे जाणे म्हणजे आत्मविश्वास.आत्मविश्वासाची कमतरता असल्यास आपली स्वप्ने अपूर्ण राहतात. आत्मविश्वासाची सुरूवात आत्म जागरूकतेने होते.कुठलेही नवीन काम करताना आपल्या मनात सुरूवातीला भीती असते.परंतु आत्मविश्वासाच्या बळावर आपण आपल्यातील कौशल्ये वापरून आपले काम चांगल्या पद्धतीने साकार करू शकतो.चुका झाल्या तर त्यातून परत शिकता येते.फक्त त्यासाठी मनात ठरवायचे की हे मला करायचे आहे आणि ते मी करणारच.त्यामुळे आपल्यात हळूहळू आत्मविश्वास वाढू लागतो.शेवटी आत्मविश्वास म्हणजे आत्मशोध,आत्म सुधारणा.स्वत:वर जितका विश्वास ठेवाल तितक्या लवकर तुम्ही यश संपादन कराल.आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे नेणारी मार्गदर्शक शक्ती आहे. आत्मविश्वासामुळे चिंता, तणाव, भीती कमी होते.
आत्मविश्वास असणारे लोक इतरांना सहजपणे प्रभावित करू शकतात.कारण इतरांपेक्षा योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो.याउलट जे विद्यार्थी कमी साध्य करणारे असतात त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी दिसून येते.त्यांना जास्त एकाकीपण जाणवते. आत्मविश्वासाने जगही जिंकता येते.पण त्यासाठी योग्य समज असावी लागते.म्हणूनच आत्मविश्वास गमावू नका.व्यक्तीमत्व विकासासाठी आत्मविश्वास प्रबळ करणे आवश्यक आहे.
लैलेशा भुरे
नागपूर