आशाताई बच्छाव
जागतिक स्तरावर उत्कृष्ट धम्म कार्य केल्याबद्दल
जपानच्या तेंदाई संघातर्फे भदंत संघरत्न मानके यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)- पय्या मेत्ता संघाचे प्रमुख व महासमाधी महास्तूपाचे निर्माते धम्मदूत आचार्य भदंत संघरत्न मानके यांना जापानच्या तेंदाई संघातर्फे जागतिक पातळीवर उत्कृष्ट धम्म कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्ध धम्माचे कार्य करणारी संस्था म्हणून पय्या मेत्ता संघ नावारूपाला आली असून या संस्थेचे संघानुशाषक भदंत संघरत्न मानके यांनी भारत व जपान या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करण्यासाठी व धम्म विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर महासमाधी महास्तूपाची निर्मिती केली आहे.तसेच डोंगरगढ येथे प्रज्ञागिरी पर्वतावर भव्यदिव्य बुद्ध मूर्तीची स्थापना केली आहे. दरवर्षी या दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाचे आयोजन केले जाते.या संमेलनाला देश विदेशातील बौद्ध धम्म गुरू धम्मोपदेश देत असतात.
एवढेच नव्हे तर भदंत संघरत्न मानके यांच्या मार्गदर्शनाखाली पय्या मेत्ता संघातर्फे अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिले जाते.तसेच आदिवासी क्षेत्रात वैद्यकीय सेवा दिली जाते व दरवर्षी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जातात.तसेच युवक युवती साठी धम्म संस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते. या धम्म कार्याची दखल घेवून जापानच्या तेंदाई संघातर्फे भदंत संघरत्न मानके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जपानच्या ओसाका तेंदाईझा हिजू माउंटेन येथील सर्वात प्रमुख संघराजा म्हणून ज्याची ख्याती आहे अशा तेंदाई संघाच्या मुख्य भदंत काउके ओकी यांच्या हस्ते जापान मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नुकताच भदंत संघरत्न मानके यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट धम्म कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भदंत नागदिपांकर, भदंत डॉ.ज्ञानदीप, भदंत मेत्तानंद, भदंत धम्मशिखर, भदंत धम्मतप, ॲड.महेंद्र गोस्वामी, संध्या राजूरकर, ज्ञानेश्वर रक्षक, धम्मानंद मेश्राम, अरूण गोंडाणे, लोमेश सुर्यवंशी, रूपचंद रामटेके, अरविंद धारगांवे, बंडू रामटेके, कांताबाई दहिवले, विलास गजघाटे,मनोहर मेश्राम यांनी अभिनंदन केले.