आशाताई बच्छाव
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात युवकांना मार्गदर्शन
अकोला : (सतिश लाहुळकर ब्यूरो चीफ अकोला) राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून युवकांना रोजगांराच्या संधी व मागदर्शन करण्यात येत आहे. यावेळी करिअर संधी, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, परदेशातील शिक्षणाच्या संधी, व्यक्तीमत्व विकास अशा विविध विषयावर तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रमिलाताई ओक हॉल, नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे, संस्था व्यवस्थापन समिती औ.प्र.संस्था मुलींची अकोला अध्यक्ष जयंत पडगीलवार, प्रभात किडस संचालक डॉ. गजानन नारे, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त, द. ल. ठाकरे, ज्येष्ठ साहत्यिक प्रा. अनघा सोनखासकर, डॉ. सुनील बिहडे, प्रा. संजय पाटील, प्रा. योगेश वाडतकर, ज्येष्ठ साहत्यिक महादेव भुईभार, प्रवचनकार संगीता ठोकरे, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभेच्छा संदेश दाखविण्यात आले. तसेच करिअर शिबिरांच्या निमित्ताने आपल्या समोर येणारे नवकौशल्य, दर्जेदार शिक्षण- प्रशिक्षण आणि रोजगार संधी याचा तरुणाईने लाभ घ्यावा, असे आवाहन संदेशाव्दारे करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी मार्गदर्शनात म्हणाले की, युवकांनी स्व:तमधील क्षमता ओळखून ध्येय निश्चित करावे. याकरिता योग्य नियोजन व कठोर परिश्रमाने स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असे आवाहन केले. तर ज्येष्ठ साहित्यिक महादेव भुईभार, प्रा. अनघा सोनखासकर, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, सहायक आयुक्त द. ल. ठाकरे, प्रा.अनंता गावंडे, डॉ. सुनील बिहाडे, संजय पाटील, प्रा. योगेश वडतकर यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे यांनी ध्येय गाठण्यासाठी योग्य दिशा देण्याचे काम आजच्या करिअर शिबिर आयोजनातून घडत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावना प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी तर सूत्रसंचालन शुभांगी गोपनारायण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटनिदेशक श्रीमती रोडगे आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.