आशाताई बच्छाव
लढवय्या नेतृत्वाचा दुःखद अंत मनाला प्रचंड वेदना देणारा – माजी मंत्री, आ.वडेट्टीवार
चंद्रपूर /गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी समजताच मन सुन्न झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना पितृशोक झाल्याची माहिती कळली. पितृशोकाच्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यापूर्वीच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथे हलवण्याची माहिती मिळाली. मात्र अतिशय जिगरबाज व लढाऊ वृत्तीचे असल्याने ते नक्कीच आरोग्य तक्रारीच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा स्वस्थ होणार अशी आशा होती. मात्र नियतीने काळाचा घाला घालत धानोरकर कुटुंबीयांवर आघात केला व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचा लढवय्या शिपाही म्हणून त्यांची ओळख होती. जनतेच्या हितासाठी राबणारा लढवय्या नेता अचानक आपल्यातून गेल्याने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. चंद्रपूर – आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन म्हणजे मनाला दुःखद वेदना देणारी व काळजाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हानी झाली असून राजकारणातील एक लढवय्या नेतृत्व हरपले.अशा दुहेरी दुःखद संकट प्रसंगी संपूर्ण धानोरकर कुटुंबीयांच्या आम्ही पाठीशी असून या दुःखातून सावरण्यासाठी धानोरकर कुटुंबीयांना बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.