
आशाताई बच्छाव
🌎 हा खेळ सावल्यांचा नजारा खंडग्रास सूर्यग्रहणाचा 🌞🌛 🌔
ऐन दिवाळीच्या सणात आश्विन अमावस्येला आकाशात ग्रहताऱ्यांचा लपंडावाचा खेळ रंगणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहणाचा कलौकीक, अद्भुत, विस्मयकारी असा नजारा पाहायला मिळणार आहे. मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर आकाशात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे ध्रुवीय प्रदेश, युरोप, पश्चिम अशिया, आणि उत्तर आफ्रिका अशा तीन खंडांमधून हे ग्रहण दिसेल . अंदमान , निकोबार आणि पूर्वांचलातील काही प्रदेश वगळता संपूर्ण भारतातून हे ग्रहण पाहता येईल .
दुपारी 2. 28 ला ग्रहणास प्रारंभ होऊन ते सायंकाळी 6.32 ला सुटेल. ग्रहण मध्य 4.30 ला असेल.
सूर्यग्रहणामध्ये चंद्राची सावली भूपृष्ठावर पडते , ती हळूहळू पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसते. त्यामुळे अक्षांश रेखांशानुसार ग्रहण दिसण्याच्या वेळा ठिकाणानुसार बदललेल्या आढळतात. त्यामुळे आइसलँड मधून हे ग्रहण दुपारी 2.28 ला सुरु होताना दिसेल , तर मुंबई मधून मात्र 4.49 ला ग्रहण स्पर्श होताना दिसेल, कोल्हापूर मधून 4.57 ला आणि सांगली मधून 4.55 ला ग्रहण लागताना दिसेल. ग्रहण मध्य 5.45 ला होईल आणि ग्रहण मोक्ष 6.32 ला असेल . मात्र मोक्ष कालापूर्वीच 6.03 ला सूर्य मावळंत असल्याने ग्रस्तावस्थेतच हा सूर्यास्त होईल. सांगली, कोल्हापूर भागातून सूर्यबिंब 10% पर्यंत ग्रासलेले पाहायला मिळेल , मात्र मुंबईतून ते 24% तर दिल्लीतून 44 टक्क्यांपर्यंत ग्रासलेले पाहायला मिळणार आहे . अद्भुत रम्य असा हा खगोलीय आविष्कार सर्वांनी जरूर पहावा.
सूर्यग्रहण कसे पहावे-
डोळ्यांची योग्य ती काळजी घेऊन सर्व अबाल-वृद्धांनी ग्रहण पाहायला काहीच हरकत नाही . केवळ डोळ्यांनी(naked eye) मात्र सूर्याकडे कधीच पाहू नये तसे केल्यास सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे दृष्टी कायमची अधू होऊ शकते . मायलरशिट किंवा ब्लॅक पॉलिमरचे सौरचष्मे solar filters सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, सूर्य पाहण्यासाठी हे सौरचष्मे सुरक्षित आणि उत्तम आहेत. जेथे असे सौरचष्मे उपलब्ध नसतील अशा ठिकाणी 14 नंबरची वेल्डिंग ग्लास वापरून आपण ग्रहण पाहू शकता. तसेच चेंडू आरशाचा सूर्यदर्शक बनवून, त्याच्या साहाय्याने भिंतीवर प्रोजेक्शन घेऊन सुद्धा छान ग्रहण पाहता येते. तसेच अंधाऱ्या खोलीमध्ये झरोक्यातून सूर्यप्रकाशाचा कवडसा पडला असेल तर त्यामध्ये ग्रहण काळात सुंदर ग्रहणाविष्कार पाहता येतो.
ग्रहण पाळणे योग्य की अयोग्य ?
ग्रहण काळात ग्रहण पाळण्याची आपल्याकडे परंपरा आहे. विशेषतः गरोदर महिलांमध्ये ग्रहण पाळणे बंधनकारक केले जाते. त्या पाठीमागे गर्भात विकृती निर्माण होते असा गैरसमज आहे. आधुनिक शरीर विज्ञानाप्रमाणे गर्भातील विकृतीचा आणि ग्रहणाचा काहीही संबंध नाही. त्याचप्रमाणे ग्रहण काळात अन्न पाणीही दूषित होत नसते. अशा गैरसमजूतींना आधुनिक विज्ञानामध्ये कसलाही आधार नाही. उलट पक्षी कडक ग्रहण पाळल्यामुळे अनेक गर्भवतींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले आहे, काहींना प्राणांसही मुकावे लागल्याचे आपण पाहतो. कारण ग्रहण पाळणे ही निसर्गाच्या विरोधी क्रिया आहे. तो केवळ अज्ञानजन्य गैरसमज आहे. त्यामुळे बऱ्याचदा गरोदर स्त्रियांच्या जीवीतास धोका निर्माण होतो. म्हणून ग्रहण पाळणे साफ चुकीचे आहे.
ग्रहणांसारख्या खगोलीय आविष्कारांच्या निमित्ताने समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करुन जुनाट गैरसमज, अनिष्ट रुढी नष्ट व्हाव्यात यासाठी सर्वांनी योग्यती काळजी घेऊन या खंडग्रास सूर्यग्रहणाचा आनंद लुटावा.
–श्री. एस, व्ही, शेलार.
खगोल अभ्यासक,
संचालक – काॅस्मिक आय, सांगली. 9657887532