Home नाशिक अवघ्या तासात रेशन कार्ड मिळाल्याने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर समाधान

अवघ्या तासात रेशन कार्ड मिळाल्याने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर समाधान

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20221006-WA0047.jpg

अवघ्या तासात रेशन कार्ड मिळाल्याने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर समाधान

मालेगाव : रेशन कार्ड मिळविण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिझवुनही उपेक्षा झालेल्या कौळाणे येथील अस्लम रहीम शेख या दिव्यांगास अवघ्या तासाभरात रेशन कार्ड प्राप्त होण्याचा चमत्कार गुरुवारी येथे घडला. बळीराजा आत्मसन्मान सेवा संघाच्या पुढाकाराचे हे फलित असून त्यामुळे या दिव्यांगाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले नसते तरच नवल !
रेशन कार्ड अभावी कुचंबणा होत असल्याची तक्रार मालेगाव तालुक्यातील कवळाने नगाव वऱ्हाणे परिसरातील गोरगरीब व आदिवासी समाजातील काही नागरिकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डाॅ. प्रतापराव दिघावकर साहेब यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत डाॅ.दिघावकर यांनी श्री कृषीसेवक बळीराजा आत्म सन्मान सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना यात लक्ष घालण्यास सांगितले. शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन डाॅ. दिघावकर यांच्या संकल्पनेतून या संघाची स्थापना करण्यात आली आहे. संघातर्फे आजवर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
रेशन कार्डसंबंधी तक्रारी आल्यावर संघातर्फे कवळाने नगाव वऱ्हाणे परिसरातील रेशन कार्ड नसलेल्या व्यक्तिंसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात दीडशेवर नागरिकांचे अर्ज भरुन घेण्यात आले. अर्जासह संबधित नागरिकांना घेऊन संघाचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे,सचिव मोठाभाऊ दळवी, राहुल पवार,प्रतीक्षा भोसले असे पदाधिकारी गुरुवारी तहसील कार्यालयाकडे निघाले होते. पवार हे आपल्या कारने जात असताना वाटेत मोसम पूल भागात कौळाणे येथील अस्लम शेख ही दिव्यांग व्यक्ती कसरत करत पायी जात असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी कार थांबवून विचारपूस केली असता रेशन कार्ड मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात जात असल्याची माहिती या व्यक्तिने दिली. तसेच गेली दोन वर्षे त्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिझवत असल्याची कैफियतदेखील मांडली.
ही कैफियत ऐकल्यावर पवार यांनी दिव्यांग व्यक्तिस उचलून आपल्या कारमध्ये बसवत तहसील कार्यालयात नेले. तहसीलदारांकडे समक्ष नेत घडलेला सर्व प्रकार कथन केला. तहसीलदार दीपक पाटील यांनी याची गंभीर दखल घेत अवघ्या तासाभरात या व्यक्तिला रेशन कार्ड उपलब्ध करून दिले. अनेकदा उंबरठे झिझवूनही या ना त्या कारणाने रेशन कार्ड मिळत नव्हते,पण आता तात्काळ रेशन कार्ड हातात पडल्याने या व्यक्तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. संघाचे पदाधिकारी व तहसीलदार पाटील यांचे त्यामुळे या व्यक्तिने मनापासून आभार मानले.
दरम्यान,शिबिरात अर्ज भरुन घेतलेल्या सर्व नागरिकांचे रेशन कार्डसाठीचे अर्जदेखील परिपूर्ण भरुन तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून लवकरच त्यांना हे कार्ड प्राप्त होतील,असा विश्वास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रेशन कार्डसाठी लागणारे शासकीय शुल्क व कागदपत्रांसाठी लागणारा अन्य खर्च संघातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here