आशाताई बच्छाव
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती ठाणे,( अंकूश पवार ब्युरो चीफ)
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा अनेक आमदारांनी त्यांना समर्थन केले; पण ठाण्यातून सर्वात आधी त्यांना आपला पाठींबा जाहीर करण्यात नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. ठाणे शिवसेनेतील मंडळींना शिंदे यांच्यासोबत आणण्यात देखील त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पडली होती.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली जात होती तेव्हा म्हस्के यांनी मुख्यमंत्री यांना पाठिंबा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ठाण्यात त्यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत म्हस्के यांनी जोरदार भाषण केले हाेते. या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदासह शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.
नरेश म्हस्के यांना शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीपक केसरकर हे मुख्य प्रवक्ते आहेत. किरण पावसकर, शीतल म्हात्रे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता नरेश म्हस्के यांचीही या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.