आशाताई बच्छाव
पिंपळगाव टोलनाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !
पिंपळगाव बसवंत- सागर कटाळे युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी सतत वादाच्या भोवऱ्यात असणारा पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा येथील कर्मचाऱ्यांमुळे चर्चेत आला आहे. नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे शासकीय वाहन टोलनाक्यावर अडवून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाटील यांना अरेरावी केल्याचे बोलले जात आहे.
अधिक माहिती अशी की, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आपल्या शासकीय वाहनाने नाशिकडे जात असताना शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ७ च्या सुमारास टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांचे शासकीय वाहन अकारण अडवून ठेवत थेट अरेरावीची भाषा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तातडीने नाशिकड़े रवाना झाले. ही घटना पिंपळगाव पोलीस ठाण्यास समजताच त्यांनी टोल कर्मचान्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेत खडे बोल सुनावल्याचे कळते. या प्रकारानंतर पोलिसांकडून संबंधित टोल कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणी पाच टोल कर्मचाऱ्यांना पिंपळगाव बसवंत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यातील अरेरावी करणाऱ्या एका कर्मचान्यावर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.
पिंपळगाव टोलनाक्यावर यापूर्वीही तत्कालीन आमदार अनिल कदम यांचे वाहन अडविल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पोलीस अधीक्षकांचे शासकीय वाहन अडवून अरेरावीचा प्रकार घडल्याने पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.