आशाताई बच्छाव
जलसंधारण महामंडळाच्या आकांक्षीत योजनेतील ७२ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांची चौकशी करा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची औचित्याच्या मुद्यावरून विधानसभेत मागणी
एन. के. कन्स्ट्रक्शन कंपनी , व निलंबित जलसंधारण प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर श्रावण शेंडे यांच्या कामांची चौकशी करण्याची केली मागणी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
जलसंधारण महामंडळाच्या आकांक्षीत योजनेतील गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली चामोर्शी, सिरोंचा, अहेरी सह अन्य तालुक्यात एन के कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत पेटी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ७२ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या व निलंबित प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर श्रावण शेंडे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मांडली
जलसंधारण महामंडळाच्या आकांक्षीत योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली चामोर्शी, सिरोंचा अहेरीसह अन्य तालुक्यात ७२ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या कामातील एका बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी ३ लक्ष रुपये नियोजित होते . त्यासाठी प्रत्यक्ष बंधाऱ्यांच्या ठिकाणी जावून त्याचे सर्वे करावयाचे होते . मात्र तसे न करता अधिकारी ६० टक्के व कंत्राटदार ४० टक्के याप्रमाणे रक्कम वाटप करून बंधाऱ्याचे कोणतेही सर्वेक्षण न करता कार्यालयात बसूनच सर्वेक्षणाचे बिल तयार करून संगनमताने बिलाची उचल करण्यात आली.
या बंधार्यांची करण्यात आलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. बंधाऱ्यांच्या गेटचे काम न करताच बिलाची उचल केल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रत्येक कामासाठी पैशाची मागणी करणारे याच विभागातील मृदा व जलसंधारण प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर श्रावण शेंडे यांना ५० लक्ष रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यात त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र कामांची चौकशी करण्यात आली नाही. या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे एन. के .कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत करण्यात आलेल्या ७२ कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बोगस कामाची व मृदा व जलसंधारण विभागातील प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करून त्यांचेवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्यावरून केली.