आशाताई बच्छाव
ग्राहक पेठतर्फे श्रावण महोत्सवाचे थाटात उद्घाटन
रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे श्रावण महोत्सवाचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक सुधीर तथा अप्पा वणजु, सौ. शैला वणजु, नाचणे गावचे माजी सरपंच संतोष सावंत, ग्राहक पेठेच्या प्रमुख प्राची शिंदे उपस्थित होत्या.
शांतीनगर (नाचणे) येथील बालाजी मंगल कार्यालयात आजपासून १६ ऑगस्टपर्यंत श्रावण महोत्सवानिमित्त हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या वेळी आंबव (ता. संगमेश्वर) येथील १८ महिला बचत गटांच्या ३६ महिला प्रतिनिधी आवर्जून प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होत्या. आंबव गावच्या सरपंच प्रिया सुवरे यांचाही सत्कार प्राची शिंदे यांनी याप्रसंगी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या नाईक यांनी केले. या प्रदर्शनाला सौ. शकुंतला झोरे, प्रणिता देसाई, स्वाती सोनार, प्रतीक्षा सरगर, यांचे सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी माजी सरपंच सावंत यांनी सांगितले की, नाचणे गावातच महिला बचत गटाच्या महिलांनी वडापावच्या विक्रीतून आर्थिक पाया भक्कम केला आहे. प्राची शिंदे यासुद्धा गेली अनेक वर्षे महिला बचत गट, उद्योगिनींना मार्गदर्शन, प्रोत्साहन देत आहेत. यावेळी अप्पा वणजु यांनीही बचत गट प्रदर्शनाबद्दल कौतुक केले. सौ. शैलाताईंचा आज वाढदिवस असल्याने त्यांचे औक्षण करून भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रदर्शनात ४२ उद्योगिनी, महिला बचत गटांनी स्टॉल्स लावले आहेत. महिला बचत गटातील महिला व इतर उदयोन्मुख उद्योजिका महिलांना गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी विविध आकर्षक वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते ८:३० वाजेपर्यंत आहे. प्रदर्शन कालावधीत विविध पारंपरिक खेळ, फुगड्या यांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. परिसरातील ग्रामस्थ, चोखंदळ ग्राहकांनी आवर्जून भेट देऊन बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्राची शिंदे यांनी केले आहे.