आशाताई बच्छाव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवः ‘जीवन गाणे गातच जावे…’
जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रम; बंदीजनांनीही केले कलागुणांचे सादरीकरण
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, अकोला जिल्हा कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे…’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दि.११ रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निवडण्यात आलेल्या कलासमुहाचे कलावंत तसेच कारागृहातील बंदीजनांनीही आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानुसार, राज्यातील ३६ प्रमुख कारागृहात या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी सादरीकरण झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात आयोजन होण्याची ही घटना, देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. व्यावसायीक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले हे या कार्यक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य!
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत या कार्यक्रमासाठी एकूण ३६ कलासमूह निवडण्यात आले होते. एक महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गृह विभागाच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले होते. या कार्यक्रमात १००० पेक्षा जास्त कलाकारांनी भाग घेतला.
अकोला येथील कारागृहात पार पडलेल्या समारंभास जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोलाचे सचिव योगेश पैठणकर, अकोला कारागृहाचे अधीक्षक सुभाष निर्मळ, समन्वयक स्वप्निल बोरकर, प्रकाश बोरकर,वरिष्ठ तुरुंगअधिकारी डी. बी. पाटील, तुरुंग अधिकारी एम.एम. जोशी, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र आर्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रम ही आयोजित केले होते.
या कार्यक्रमात कारागृहातील अनेक कैद्यांनी सहभाग घेतला. काही कैद्यांनी अप्रतिम वादन, गायन, काव्यवाचन आणि नृत्य करून त्यांच्यातील कला सादर केली. कैद्यांमधील कलाकार पाहण्याची दुर्मिळ संधी यावेळेस मिळाली.
राज्याच्या गृहविभागाचे सहकार्य
राज्याच्या गृह विभागाने या उपक्रमासाठी सर्व सहकार्य केले. तुरुंग प्रशासन आणि गृह विभाग यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे कार्यक्रम होऊ शकले. राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांनी, या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुरुंग प्रशासनाला आदेश देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले होते. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा पुणे, सुनील रामानंद यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. हेमंत पवार संशोधन अधिकारी, कारागृह व सुधार सेवा यांनी याबाबत योग्य तो समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमात स्थानिक वसंत मानवटकर यांनी प्रबोधनात्मक सादरीकरण केले. रहिम शेख व मोहसीन शेख यांनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी वाद्यवृंद व दिग्दर्शन स्वप्निल बोरकर यांचे होते. तर योग प्रशिक्षण व समुपदेशन डॉ. राजेश भोंडे व रेखा वानखडे यांनी केले.
कलाकारांच्या प्रतिक्रिया कारागृहातील कैद्यांसाठी कार्यक्रम करणे हे कलाकारांसाठी आव्हान होते व हा एक वेगळा अनुभव होता असे अनेक कलाकारांनी नमूद केले. या कार्यक्रमांमधून मनोरंजन व प्रबोधन करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक कलाकारांनी शासनाचे आभार मानले.