आशाताई बच्छाव
गंगाबाई माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !
▪️शिक्षकांनी फुले दाम्पत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा- कर्मवीर किशनराव राठोड यांचे प्रतिपादन !
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड -शिक्षकांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहावे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नरत राहावे असे स्पष्ट प्रतिपादन विमुक्त जाती सेवा समिती शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांनी केले.
सावरगाव पिरजादा येथील गंगाबाई माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंताचा सत्कार सोहळा निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून राठोड साहेब बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक गोविंद पवार ,मुख्याध्यापक मनोहर पाटील सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक यशवंत बोडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना किसनराव राठोड साहेब पुढे म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीबाई फुले यांनी प्रस्थापितांच्या शेणा चिखलाचा मारा सहन करून मुलींच्या शिक्षणाची पहिली शाळा सुरू केली आणि त्यांनी स्वतः शिक्षक बनून त्यांना घडवण्याचं काम केलं या फुले दाम्पत्याचा आदर्श आजच्या सर्व शिक्षकांनी डोळ्यासमोर ठेवून महिला शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे महिला शिकल्या तरच येणारी पिढी शिकून-सवरून कार्यक्षम होईल अन्यथा पिढी बरबाद होईल अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किसनराव राठोड साहेब पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून मन लावून अभ्यास करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा उत्कर्ष साधावा असे आवाहनही त्यांनी केले .
आज सर्वच क्षेत्रात मुली समोर आल्या असून मुलांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर एक पाऊल पुढे टाकून मुली मुलींनी सर्व क्षेत्र काबीज केली आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या मुलींनीही स्वतःला कमी न समजता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे आणि उच्चशिक्षण घेऊन आपला आणि पर्यायाने समाजाची सेवा करावी .
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या प्रगती बद्दल ची माहिती दिली. ग्रामीण भागात ते शाळा असूनही या वर्षी शाळेतील 25 पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी या 90 पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गंगाबाई माध्यमिक विद्यालयातील सेवक शेख बाबू मैनुद्दिन यांच्या सेवापुर्ती बद्दल त्यांचा कपडे रुपी आहेर भेट देऊन त्यांना निरोप देण्यात आला . यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक संजय पाटील श्रीरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन भीमराव पाटील वडजे यांनी केले .कार्यक्रमास पंचक्रोशीतील पालक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्नेह भोजनने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती नारलावर मॅडम ,व्यवहारे मॅडम, जाधव सर श्रीराम पवार, श्री चिल्लरगे सर, वंजे सर आदींनी विशेष परिश्रम घेतले.






