
राजेंद्र पाटील राऊत
शासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना
हेल्मेट आवश्यक; 61 जणांवर कारवाई
अकोला :(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)– परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शासकीय विभागात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारावर आज विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात विना हेल्मेट येणाऱ्या 61 दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.
वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी किंवा मृत पावणारे वाहनस्वार हे विना हेल्मेट प्रवास करणारे असतात. हेल्मेट वापरासंबंधीत प्रबोधनात्मक व अंमलबजावणी व्हावी याकरीता तपासणी मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली. ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. ही मोहिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी स्वतः उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या कारवाईची माहिती घेतली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पथक क्रमांक 1 मध्ये मोटार वाहन निरीक्षक अभिजीत टाले, सहायक मोटार वाहन निरीक्षक नितीन खरात, गोपाल पंचाली व कृष्णा नेवरे यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर येथे पथक क्रमांक 2 मध्ये मोटार वाहन निरीक्षक संदिप तुरकणे, सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके, भागवत चोपडे, दिनेश एकडे, वाहन चालक गौतम अरखराव व मोहम्मद अतहर यांनी तपासणी मोहिम राबविली.