राजेंद्र पाटील राऊत
🛑 ‘आला रे आला ‘ तुमचा बाप आला’ ही आरोळी महागात; पोलिसांनी एक वर्षासाठी केलं स्थानबद्ध 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याच्या मिरवणुकीची `आला रे आला,तुमचा बाप आला`ही क्लिप सोशल मिडीयात व्हायरल करणे त्याच्या टोळीतील सराईत गुन्हेगार संतोष पांडुरंग तोंडे (वय ३८, रा.कोथरुड, पुणे, सध्या खेचरे, ता.मुळशी, जि.पुणे) याला महागात पडले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याला ‘एमपीडीए’अन्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. गेल्या दहा महिन्यांत आयुक्तांनी ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केलेला हा ३६ वा गुंड आहे. त्यांनी याच कालावधीत गुंड टोळ्यांविरुद्ध ‘मोका’ कारवाईचे अर्धशतकही ५४ ,पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजे मोका आणि राज्य विध्वसंक कारवाया प्रतिबंध कायदा तथा एमपीएडीए अशा दोन्ही कायद्यांचा बडगा पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारीची बीमोड करण्यासाठी उगारला आहे. त्याअन्वयेच संतोष तोंडेवर कारवाई केली आहे. यावर्षी १५ फेब्रुवारीला अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खूनातून गजा मारणे निर्दोष सुटला. नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली.
तेथून त्याच्या साथीदारांनी त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गजा मारणेचे दोनशे-तीनशे गुंड व हितचिंतक त्यात कित्येक आलिशान मोटारीतून सामील झाले होते. टोलनाक्यावर त्यांनी टोल, तर भरला नाहीच. उलट तेथे पाणी बाटल्या,वडापाव व इतर खाद्यपदार्थांचेही पैसे दिले नाहीत. त्यांनी ड्रोनने मिरवणुकीचे शूटिंग केले. मुळशी पॅटर्न या चित्रपटातील आला रे आला, तुमचा बाप आला, हा डायलॉग घेऊन तयार करण्यात आलेला मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मिडियात तोंडेने व्हायरल केला.
दरम्यान, या मिरवणुकीबद्दल पिंपरी-चिंचवडसह पुणे पोलीस आयुक्तालयातही अनेक गुन्हे दाखल होऊन त्यात खुनातून सुटलेल्या गजाला पुन्हा गजाआ़ड जावे लागले. तर, हीच गत त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या त्याच्या साथीदारांचीही झाली. या मिरवणुकीत तोंडे हा ही सामील झाला होता. त्यानेच सोशल मिडियात हा व्हिडिओ टाकून दहशत निर्माण केली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेले गजाच्या काही हितचिंतकांना नंतर जामीन मिळाला.
ही संधी साधून तोंडेवर पुणे पोलिसांनी कडक कारवाई करीत एक वर्षासाठी त्याला तुरुंगात डांबले. त्यासाठी गेल्या १५ वर्षातील त्याचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात आला. या कालावधीत त्याच्याविरुद्ध दरोडा, खंडणी, मारामारी असे आठ गुन्हे नोंद होते. त्यात हा नवा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्याविरुद्ध कोथरुड पोलिसांनी एमपीडीएचा प्रस्ताव करून तो आयुक्तांना पाठविला. तो नुकताच त्यांनी मंजूर केल्याने आपल्या बॉसच्या सुटकेनिमित्त त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या तोंडेला, मात्र तुरुंगात जाण्याची पाळी आली.⭕