राजेंद्र पाटील राऊत
माणुसकीचा धर्म जपत वन्नाळी येथील गुरूद्वाऱ्याची कार सेवा. वझरगा, वन्नाळी येथील ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे नांदेड-देगलूर महामार्ग पुर्णपणे बंद होता, अनेक प्रवासी अडचणीत सापडले होते त्या प्रवाशांना वझरगा येथे ग्रामस्थांनी जेवणाची सोय केली. त्याबरोबरच वन्नाळी येथील गुरूद्वारा मंडळानेही यात महत्त्वाची भूमिका बजावली. कालपासून अडकलेल्या काही प्रवाशांना रात्री गुरूद्वारा लंगर मार्फत जेवणाची सोय प्रत्यक्ष प्रवाशापर्यंत जाऊन करण्यात आली. व महीला, लहान बालके आणि सहपरिवार प्रवाशी यांच्यासाठी गुरूद्वाऱ्यामध्ये रात्री मुक्कामी थांबण्याची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली. पुन्हा सकाळी पोटभर जेवण व पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था चार ते पाच किलोमीटर लागलेल्या गाड्यांच्या लांबच-लांब रांगा असताना देखील प्रत्येक गाडीजवळ जाऊन प्रत्यक्ष कारसेवकामार्फत करण्यात आली.
प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कालपासून वझरगावासी, वन्नाळीवासी व गुरूद्वारा मंडळ, आणि प्रशासन यंत्रणा मानवतावादी भावनेतून सक्षमपणे उदार अंतकरणाने कार्य करत होते. त्यामुळे महापुराचा थैमान असतानाही दोन दिवसांत येथे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. विशेष सांगावयाचे म्हणजे अडकलेल्या प्रवाशांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागले नाही.
यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सरचिटणीस तथा भावी आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी दोन दिवस सतत प्रत्यक्ष पाहणी दौरा करून प्रशासन यंत्रणेने परिसरातील जनतेला सतर्क राहण्याचा इशारा केला. घटनास्थळी दोन दिवस तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलिस यंत्रणा सक्षमपणे कार्य करत होती. तसेच परिसरातील वझरगा, वन्नाळी येथील सुजाण नागरिकही मोठ्या उदार मनाने मदतीचा हात पुढे करत होती. परिसरातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व स्वयंसेवी युवक उत्स्फूर्तपणे सहकार्य करत होते. यात गुरूद्वारा मंडळाचीही भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे महापुरात अडकलेल्या प्रवाशांना एक प्रकारचा सुरक्षित आधार मिळाला आणि मानवतेचा साक्षात्कार घडला. म्हणून मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा” ही मानवतावादी मूल्यांचीच संस्कारपीठे आहेत याची खरी साक्षच या प्रसंगाने आली.
रस्ता आता सुरळीत सुरू झाला आहे, अडकलेले प्रवासी आनंदाने घरी जाऊ लागले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर सुखरूप असल्याचा आनंद पाहून आम्हासही अलौकिक समाधानाने भरून पावल्याचा अनुभव लाभतो आहे. अशा कठीण प्रसंगी मिळालेल्या मदतीची चर्चा परिसरातून ऐकावयास मिळत आहे.