राजेंद्र पाटील राऊत
महापालिकेच्या रिंगणात उतरणार स्वाभिमानी शेतकरी संघटना
कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत माजी. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैभव कांबळे म्हणाले, ”कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला स्वाभिमानी पक्षाच्या कामाच्या आणि आंदोलनाच्या पध्दतीची माहिती आहे. हा पक्ष फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नापुरताच लढत नाही तर सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी देखील लढत आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सध्या महापालिकेच्या राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधक हे फक्त राजकारण करण्यातच मग्न आहेत.
त्यांना नागरिकांच्या प्रश्नाशी काहीही घेणे, देणे नाही. त्यामुळे स्वाभिमानी पक्षाने निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.”
यावेळी जनार्दन पाटील, अजित पोवार, संजय चौगुले, आण्णा मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानीचा निवणूक अजेंडा पण सांगण्यात आला. कोल्हापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळण्यासाठी खेड्यातील माल थेट शहरातील नागरिकांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. शहरात रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न तसेच अनेक पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. ते सर्व प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सोयी मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार. मागील अनेक वर्षांपासून स्थानिक नेत्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष नाही. नागरिकांना देखील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क.