*बांबवडेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
कोल्हापूर जिल्ह्यात बांबवडे तालुक्यातील बांबवडे इथल्या मुख्य चौकात मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
बसवल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. या प्रकारामुळे बांबवडेसह परिसरात एकच खळबळ उडाली. बेकायदेशीरपणे पुतळा बसवल्याचं लक्षात येताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र,शाहुवाडी तालुक्यातील शिवप्रेमींनी याला विरोध दर्शवल्याने या ठिकाणी दिवसभर तणाव कायम होता. अखेर पोलिसांनी सायंकाळी बळाचा वापर करत शिवप्रेमींना आडवलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून हा पुतळा सन्मानाने काढून घेतला ,
कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे की एक मोठी बाजारपेठ आहे.या बाजारपेठेला लागून असलेल्या चौकात अज्ञातांनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. या प्रकारामुळे बांबवडेसह परिसरात खळबळ उडाली. पुतळा पाहण्यासाठी सकाळी शिवप्रेमींनी गर्दी केली. पोलीस आणि अन्य प्रशासनाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला शिवप्रेमींनी कडाडून विरोध केला.
शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी दिवसभर ठाण मांडलं होतं. त्यामुळे बाजारपेठेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात होता. प्रशासनाने दिवसभर या शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवप्रेमी पुतळा काढू नये, यावर ठाम होते. परवानगी घेतली नसली तरी आता परवानगी काढू, मात्र बसलेला पुतळा हटवू नका, अशी त्यांची मागणी होती.
दिवसभर आवाहन करुनही शिवप्रेमी ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी सायंकाळी बळाचा वापर केला. या ठिकाणी असलेल्या माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. अखेर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आणि पुतळा परिसर रिकामा केला. पुतळ्याच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेऊन पुतल्याला दुग्धाभिषेक केला आणि विधिवत पूजा केली. त्यानंतर हा पुतळा चारही बाजूनी बंदिस्त करत काढून घेण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान या सर्व प्रकारामुळे बांबवडे परिसरात दिवसभर तणाव अनुभवायला मिळाला.