• Home
  • *कोरोनावरील इंजेक्शन्स, औषधे जिल्ह्यात उपलब्ध* ;

*कोरोनावरील इंजेक्शन्स, औषधे जिल्ह्यात उपलब्ध* ;

*कोरोनावरील इंजेक्शन्स, औषधे जिल्ह्यात उपलब्ध* ;

*ऑक्सिजन पुरवठ्याच्या पर्यवेक्षणासह सुलभ, समान व वाजवी दरात तो उपलब्ध करून द्यावा*
*-माधुरी पवार*

*नाशिक, दि. 6 सप्टेंबर 2020 (जिमाका वृत्तसेवा):*

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कोरोनावर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन, जिल्ह्यातील 40 औषध विक्रेत्यांकडे असून त्याचबरोबर करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांतील मेडीकल ऑक्सिजन पुरवठ्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची प्रशिक्षित तंत्रज्ञ, अभियंते यांच्यामार्फत तपासणी करण्याच्या व ते वाजवी दरात सहज उपलब्ध करून देण्याच्या सूचना ऑक्सिजन पुरवठादारांना दिल्या असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या संसर्गावर उपचाराकरिता लागणारी रेम्डीसीवर व टॉसिलिझुमॅब इंजेक्शन्स, फॅबीफ्ल्यु टॅब्लेट ही औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावीत याकरीता दररोज त्यांच्या उपलब्ध साठ्याची माहिती संकलित करून जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविण्यात येत आहे. तसेच ही औषधे ज्या मेडीकल्समध्ये उपलब्ध आहेत त्यांचे संपर्क क्रमांक वेळोवेळी प्रसिद्ध केले जात आहेत.

कोरोना उपचाराकरीता नेमलेल्या सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सहज आणि समान तसेच वाजवी दराने उपलब्ध करण्याबाबत दक्ष राहावे अशा सूचनाही शहरातील ऑक्सिजन उत्पादकांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णालयात मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीसाठी लागणारी उपकरणे योग्यरीत्या काम करीत आहेत की नाही, याबाबतचे पर्यवेक्षण करण्याच्या सूचना ऑक्सिजन उत्पादकांना, पुरवठादारांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्ग झलेल्या बहुतेक रुग्णांना मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीची गरज भासत आहे. सदर उपचार पद्धतीसाठी लागणारी उपकरणे व इतर साहित्य योग्य व प्रभावीपणे वापरणे गरजेचे आहे. मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीदरम्यान उपकरणांची जोडणी, ऑक्सिजन फ्लोर रेट व उपलब्ध मेडीकल ऑक्सिजनचा साठा, रिकामे झालेले नळकांडे तत्काळ पुनर्भरणासाठी उत्पादकांकडे पाठवणे इत्यादींसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ अभियंते यांच्यामार्फत पर्यवेक्षण होणे गरजेचे आहे. या सर्व बाबी विचारात घेता खबरदारी म्हणून रुग्णालयातील मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीसाठी लागणाऱ्या उपकरणांची तपासणी जैववैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित तंत्रज्ञ अभियंते यांच्यामार्फत करण्यात यावी व तसा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागात सादर करण्यात यावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी संबंधीत रूग्णालये व ऑक्सिजन पुरवठादारांना दिल्या आहेत, असेही त्यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

anews Banner

Leave A Comment