*कोरोनाने कोल्हापूरात पोलिसाचा पहिला बळी*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*
कोरोनाने जिल्ह्यातील पहिल्या पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील हेड पोलिस कॉन्स्टेबल संजित विलास जगताप (वय ४९, रा. श्री कॉलनी लाईन बजार) यांचा बुधवारी रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी मार्च महिन्यापासून पोलिस रस्त्यावर उतरून अव्याहत बंदोबस्त बाजवत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर गुन्ह्यांच्या प्रमाणावत वाढ होऊ लागली. दैनदिन काम, गुन्ह्यांचा तपासाबरोबर कोरोनाचा बंदोबस्त असा कामाचा ताण सध्या पोलिसांवर आहे.
कर्तव्य बजावताना त्यांचा अनेकांशी संपर्क येत असल्याने आता पर्यंत जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी अशा १८०जणांना कोरोनाची बाधा झाली.
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हणून संजित जगताप हे कार्यरत होते. त्यांना कोरोना योद्धाची भूमिका बजावताना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांना २५ ऑगस्टला त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती घोडावत इन्स्टिट्यूट येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्याला पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही दुजोरा दिला. ते १९८९ मध्ये सोलापुरातून पोलिस भरती झाले होते. १९९३-९४ ते कोल्हापूर जिल्ह्यात बदली होऊन आले. त्यांनी यापूर्वी हातकणंगले, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावले होत. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
