मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याबाबत सुचना निर्गमीत –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
मुंबई, दि.१३ – राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ध्वजसंहितेनुसार ग्रामीण भागात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ज्या गावांमध्ये सरपंच कार्यरत आहेत तिथे स्वातंत्र्यदिनी नियमानुसार ध्वजारोहण होईल. पण ज्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत तिथे कोरोना संकटामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. या ग्रामपंचायतींवर गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण याबाबत सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे.
