• Home
  • शाळाची घंटी १ सप्टेंबरपासून वाजणार !

शाळाची घंटी १ सप्टेंबरपासून वाजणार !

शाळाची घंटी १ सप्टेंबरपासून वाजणार !

प्रतिनिधी=किरण अहिरराव

मुंबई :
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करणे जिकिरीचे असले, तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिक्षण विभागाच्या या धाडसी पावलामुळे शैक्षणिक वर्ष ‘ड्रॉप’ होण्याबाबतची पालकांच्या मनातील चिंता अखेर दूर झाली आहे.

सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्याबाबतची चाचपणीही झाली आहे. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती गायकवाड यांनी . ” युवा मराठा न्युजला” दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 15 जूनपासून शाळा प्रत्यक्षात सुरू होऊ शकल्या नाहीत.

सध्या सर्व ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ई-शैक्षणिक साधने खरेदी करणे शक्य नाही. इतकेच नाही, तर ई-शिक्षणाला विद्यार्थ्यांची मनापासून तयारी नाही. हातात पेन, पेन्सिल असली तरी शाळा भरल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये थेट शाळा सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

आता कोरोना स्थिती सुधारतेय

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच आदिवासी, दुर्गम भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने या पट्ट्यांतील शाळा सुरू करण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, केंद्र सरकारने आक्षेप घेतल्याने आम्हाला त्या थांबवाव्या लागल्या होत्या. मात्र, आता राज्यातील अनेक भागात परिस्थिती सुधारत असल्याने आम्ही या शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा आता सुरू केल्या नाहीत, तर विद्यार्थीसंख्या घटण्याची भीती शासनाला वाटत आहे. तर पालकांना शैक्षणिक वर्ष ड्रॉप होईल की काय, अशी चिंता वाटू लागली आहे. विद्यार्थी एक वर्ष मागे राहील. त्यावर नाहक खर्च करण्याची वेळ येईल, या चिंतेने पालकांची झोप उडाली आहे; पण शालेय शिक्षण विभागाने सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा मिळाला आहे.

राज्यातील शाळांची सुरुवात टप्प्याटप्प्याने आणि स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन केली जाणार आहे. तर आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शाळा तातडीने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विदर्भातील शाळा या सर्वात उशिराने सुरू होतात. त्या काळात या भागात खूप ऊन असल्याने शिक्षण विभागाकडून निर्णय घेतला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच कोरोनामुळे विदर्भातील काही ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये ऑगस्टपासूनच शाळा सुरू करण्याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी सूतोवाच केले होते. त्यानुसार या शाळा सुरू केल्या जाणार होत्या. परंतु, राज्यभरात पावसाचा जोर वाढल्याने या शाळा येत्या काही दिवसांनंतर सुरू केल्या जाणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.

anews Banner

Leave A Comment