*एस.टी.कामगारांच्या पगारसाठी* *मुंबईत बैठ घेणार .*
मोहन शिंदे (ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नासंदर्भात येत्या चार- पाच दिवसात मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्याची माहिती एसटीच्या संघटनेचे सचिव हनुमंत ताटे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
बारामतीत या दोघांनी आज पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत, तसेच त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या चार- पाच दिवसात याबाबत मुंबईत बैठकीचे आयोजन करणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी कामगारांच्या बिकट झालेल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष घालावे व एसटी महामंडळास दोन हजार कोटी आर्थिक साहाय्य करावे, यासाठी या आधीही मान्यताप्राप्त संघटनेने पत्र व्यवहार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटीवर अवलंबून कामगारांची संख्या व एसटीचे योगदान विचारात घेत राज्याच्या जीवनवाहिनीचे राज्य सरकारात विलीनीकरण करण्याबाबतही निवेदनात आग्रही मागणी करण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले असल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर गवंडीकामासह, भाजीपाला विक्री करणे किंवा खासगी वाहनांवर चालक म्हणून जाण्याची पाळी आली आहे. अनेकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालण्याची या नेत्यांची मागणी होती. दरम्यान, अजित पवार यांनी या संदर्भात बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिलेली असल्याने हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा हनुमंत ताटे व संदीप शिंदे यांनी व्यक्त केली आहे.