• Home
  • युवराज देवरे प्रतिनिधी दहीवड) नाशिकचा कांदा पहिल्यांदाच रेल्वेद्वारे बांगलादेशात..!

युवराज देवरे प्रतिनिधी दहीवड) नाशिकचा कांदा पहिल्यांदाच रेल्वेद्वारे बांगलादेशात..!

(युवराज देवरे प्रतिनिधी दहीवड)
नाशिकचा कांदा पहिल्यांदाच रेल्वेद्वारे बांगलादेशात..!
दिनांक : 11-Jul-20
नाशिक / निफाड : नाफेडतर्फे महाराष्ट्रात 75 हजार टन कांद्याची खरेदी केली जाणार आहे. त्यांपैकी 44 हजार टन कांद्याची खरेदी झाली आहे. या महिन्याअखेरपर्यंत नाफेड कांद्याची खरेदी करणार आहे. शिवाय नाशिकचा कांदा पहिल्यांदा रेल्वेद्वारे बांगलादेशात पोचला आहे.
० नाशिकचा कांदा पहिल्यांदाच रेल्वेद्वारे बांगलादेशात : स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याच्या मुद्द्यावर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सोशल मीडियातून आंदोलन छेडले होते. आता आणखी कांद्याची खरेदी सुरू ठेवत बाजार समितीप्रमाणे नाफेडतर्फे खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे भाव रोज जाहीर करावेत, अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा बांगलादेशमध्ये निर्यात होतो. मात्र, निर्यातबंदीमुळे मागणी व पुरवठा साखळी बिघडली. पुढे निर्यातबंदी उठली, पण कोरोनामुळे रस्ते वाहतुकीत बांगलादेशात माल जाण्यापूर्वी स्थानिक पश्‍चिम बंगाल सरकारचा विरोध झाल्याने अडचणी आल्या. आता विशेष रेल्वेद्वारे थेट बांगलादेशात कांदा निर्यातीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नाशिकमधून पहिल्या टप्प्यात रेल्वेद्वारे एक हजार 600 टन कांद्याची निर्यात झाली आहे.
० जवळपास दीड लाख टनांवर कांदा निर्यात : लॉकडाउनदरम्यान केंद्राने निर्यातीच्या सूचना दिल्या. मात्र, बंगाल सरकारने हरकत आणल्याने हे काम अडचणीत होते. त्यामुळे बांगलादेश सीमेवरील मेहंदीपूर, गोजुडांगा, बनगाव ही व्यापारी केंद्रे बंद असल्याने माल पोचू शकला नव्हता. आता बांगलादेशमधील स्थानिक कांदा संपला आहे. तसेच बंगालमधील सुखसागर येथील कांदा स्थानिक ठिकाणी वितरित होत असल्याने मागणी वाढली आहे. आता वाहतुकीची अडचण मिटल्याने निर्यातदारांमध्ये संतोषाचे वातावरण आहे. या वर्षी मे व जून महिन्यात रस्ते व रेल्वेच्या माध्यमातून जवळपास दीड लाख टनांवर कांदा निर्यात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
० कामास गती : भारत-बांगलादेश सरकारच्या माध्यमातून विशेष परवानगीने काही निर्यातदारांनी मका, डाळ निर्यात क���ली होती. त्यानंतर शेतमाल वाहतुकीसाठी पाठपुरावा केल्यानंतर व्यापारवृद्धीसाठी येथील बेनापोल- पेत्रपोल रेल्वे लिंकद्वारे कंटेनर ट्रेन सर्व्हिस सुरू करण्यास बांगलादेशने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत रेल्वेद्वारे मालदा येथे उतरवून तो बांगलादेशमध्ये जायचा. आता थेट बांगलादेशात रेल्वेची सुविधा झाल्याने कामास गती येणार असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.
💬नाशिक रोड, निफाड, खेरवाडी, लासलगाव, मनमाड, येवला, नगरसूल. आपला कांदा कमी खर्चात थेट बांगलादेशात जाणार आहे. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यात रेल्वेची मागणी वाढत जाणार आहे. हा पर्याय सोपा आहे. आता थेट पर्याय उपलब्ध झाल्याने कामात सुलभता येईल. – दीपक भुतडा, कांदा निर्यातदार, निफाड

anews Banner

Leave A Comment