‘सारथी’ च्या कामकाजाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील कार्यालयाला भेट –
विशेष प्रतिनिधी ; राजेश एन भांगे
पुणे,दि. ११ मराठा समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या ‘सारथी’ संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेसा, त्यांचा गौरव वाढवणारा असला पाहिजे. त्यासाठी ‘सारथी’ने भविष्याचा वेध घेऊन प्रकल्प तयार करावेत, ‘व्हिजन डॉक्युमेंट 2020-30’ तयार करुन पुढच्या दहा वर्षांचा आराखडा तयार करावा, संस्थेचं काम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबरोबरच शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ‘सारथी’ संस्थेत आयोजित विशेष बैठकीत दिला. ‘सारथी’ला कायमस्वरुपी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
‘सारथी’ संस्थेची जबाबदारी नियोजन विभागाकडे घेण्याची घोषणा काल केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लगेचच पुणे येथील ‘सारथी’च्या कार्यालयाला भेट दिली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला व संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, संचालक उमाकांत दांगट, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘सारथी’च्या कामाला योग्य दिशा व गती देण्यासाठी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मराठा विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्थापन ही संस्था चांगली चालली पाहिजे. संस्थेच्या कामात त्रुटी राहता कामा नयेत, कारभारात पादर्शकता असली पाहिजे. संस्थेच्या निधीबाबतची माहिती वेबसाईटवर वेळच्यावेळी उपलब्ध झाली पाहिजे. युवकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरंच कौशल्यविकासावर भर द्यावा. गरज ओळखून व भविष्याचा वेध घेऊन नवीन प्रकल्प तयार करावेत, असे सांगून जुन्या प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. सारथी संस्थेने दहा वर्षांचा विचार करून ‘व्हिजन डॉक्युमेंट 2020-30’ चे सर्वंकष नियोजन केल्यानंतर निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच मंत्रालयात खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन ‘सारथी’ला ताकद देण्यासाठी विविध निर्णयांची घोषणा केली होती. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केल्या. ‘सारथी’ला 8 कोटींचा निधीही त्यांनी तातडीने उपलब्ध करुन दिला. त्यानंतर आज लगेचच उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातील ‘सारथी’ संस्थेला दिलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.