Home Breaking News गणेश मूर्तिकारांपुढे कार्यशाळेचे विघ्न, मूर्ती बनवण्यासाठी जागेची अडचण मुंबई ( साईप्रजित...

गणेश मूर्तिकारांपुढे कार्यशाळेचे विघ्न, मूर्ती बनवण्यासाठी जागेची अडचण मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

116
0

🛑 गणेश मूर्तिकारांपुढे कार्यशाळेचे विघ्न, मूर्ती बनवण्यासाठी जागेची अडचण 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 26 जून : ⭕ गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना अद्यापही गणेश मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी कार्यशाळांना जागाच मिळालेल्या नाहीत. कार्यशाळांसाठी महापालिकेने परवानगी न दिल्याने गणेश मूर्तिकारांपुढे मूर्ती घडवण्याचे विघ्न समोर ठाकले आहे. एकाबाजुला राज्य सरकार पर्यावरण पुरक म्हणून शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याचे आवाहन करत आहे. त्यासाठी मूर्तिकारांनी गुजरातहून शाडूची माती आणली. परंतु, कार्यशाळांना सुरु करण्यास परवानगीच न मिळाल्याने गणपतीच्या मूर्ती सुकणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या मूर्तिकारांच्या समस्येकडे कोविडच्या नावाखाली राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून त्यांच्या उदासिन धोरणामुळे मूर्ती घडवण्यातच विलंब होत आहे.
श्री गणरायांचे आगमन येत्या २२ ऑगस्ट रोजी होत असून या उत्सवासाठी गणेश मूर्तिकारांची मूर्ती घडवण्याच्या कामाची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, एरव्ही जून महिन्यात गणेश मूर्तिकारांना पदपथाशेजारी किंवा मैदानांमध्ये मूर्ती घडवण्यास कार्यशाळेसाठी जागा महापालिकेच्या परवानगीने उपलब्ध करून दिली जाते. परंतु, यंदा जून महिना उलटत आला तरी गणेश मूर्तिकारांना कार्यशाळेसाठी अद्यापही जागा उपलब्ध झालेली नाही. शासनाने, मूर्तिकारांना शाडूच्या मातीपासून पर्यावरण पुरक गणेश मूर्ती बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार गणेश मूर्तिकारांनी गुजरातहून ५ कंटेनर शाडूची माती मुंबईत आणून मूर्तिकारांना या मातीचे वितरण केले आहे. परंतु, माती येऊन पडली तरी मूर्ती घडवण्यासाठी जागाच नाही. सध्या घरांमध्ये मूर्ती घडवण्याची कामे सुरु केली असली तरी दहा बाय दहाच्या घरांमध्ये घरच्यांनी राहायचे कुठे आणि मूर्ती ठेवायचे कुठे असा प्रश्न मूर्तिकारांपुढे निर्माण झाला आहे.

सरकार आणि महापालिकेच्या उदासिन धोरणामुळे मूर्ती घडवण्यास विलंब बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले गणेशोत्सव दोन महिन्यांवर आला आहे. एका बाजुला शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याचे आवाहन सरकार आणि महापालिका प्रशासन करत आहे. परंतु, दुसरीकडे मूर्ती घडवण्यासाठी अद्यापही महापालिकेच्यावतीने परवानगी दिली जात नाही. महापालिका प्रशासन पोलिसांवर आणि पोलीस हे महापालिकेवर बोट दाखवत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबाबत शासन निर्णय आणि नियमावली होणे आवश्यक आहे. परंतु, ती अद्यापही जाहीर केली जात नाही. खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांना स्मरणपत्र दिले. तरीही त्यांचे मूर्तिकारांच्या समस्येकडे लक्ष नाही. त्यामुळे मूर्ती कशा घडवायचा हाच प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

एक मूर्ती बनवायला तीन दिवस लागतात आणि एक मूर्ती सुकायला २५ ते ३० दिवस लागतात. आम्हाला दरवर्षी ३०० ते ४०० गणेश कार्यशाळेसाठी परवानगी दिली जाते. त्यामुळे मागील वर्षी ज्यांना परवानगी दिली होती, त्यांनाच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मूर्ती घडवण्यास परवानगी दिली जावी. पण, कोविडचे कारण देत मूर्ती कामाला विलंब केला जात आहे. याचा परिणाम मूर्ती घडवण्यावर होणार आहे. मूर्ती घडवण्यास जर विलंब झाला तरी अनेक भक्तांनी दिलेल्या मूर्ती बनवता येणार नाही. त्यामुळे यासर्वांचा विचार करता महापालिकेने कार्यशाळांना परवानगी दिल्यास किमान मूर्ती घडवण्याच्या कामांना सुरुवात करता येईल,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरेाना कोविड १९चा आजार संपूर्ण देशात असून पदपथांवर गणेश मूर्ती बनवण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना अपेक्षित आहेत. त्यामुळे तोपर्यंत या परवानगी स्थगित ठेवल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या पुढील सुचनेनुसार महापालिका परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु करेल. – नरेंद्र बर्डे, उपायुक्त व महापालिका सार्वजनिक उत्सव समन्वयक⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here